बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर वादग्रस्त टीका करून नेहमीच चर्चेत राहणारी कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संजय लीला भन्साळींच्या सुपरहिट चित्रपटातील भूमिकेसाठी आपल्या नावाचा विचार केला होता असं कंगना एका मुलाखतीत म्हणाली.
२०१८ साली ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, शाहीद कपूर, अदिती राव हैदरी यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात होती. दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत होती. ‘पद्मावतमध्ये मी काम करावं अशी संजय लीला भन्साळींची इच्छा होती. मला स्क्रिप्टही वाचून दाखवण्यात आली होती. मात्र यासंदर्भातलं बोलणं पुढे गेले नाही यानंतर मी मणिकर्णिकामध्ये व्यग्र झाले ‘ असं कंगना मुलाखतीत म्हणाली.
इतकंच नाही तर ‘रामलीला’ चित्रपटातील एक गाणं मी करावं अशीही भन्साळींची इच्छा होती. नंतर हे गाणं प्रियांका चोप्रावर चित्रीत करण्यात आल्याचंही तिनं या मुलाखतीत सांगितलं. सध्या कंगना राणौत ही ‘मेंटल है क्या’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. राजकुमार रावची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. या चित्रपटाबरोबरच ‘पंगा’ हा तिचा चित्रपटही याच वर्षांत प्रदर्शित होत आहे. कंगना तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्येही मुख्य अभिनेत्री म्हणून करणार आहे. या चित्रपटासाठी तिनं २४ कोटी इतकं मानधन आकारल्याचंही म्हटलं जात आहे.