अभिनेते शरद पोंक्षे यांचं ‘नथुराम गोडसे’ हे नाटक जितकं वादग्रस्त ठरलं. तितक्यात त्या नाटकाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी या नाटकाचा खडतर, संघर्षमय प्रवास संपला. २५ वर्षांपासून सुरू असलेल्या या नाटकाचा शेवटचा प्रयोग प्रजासत्ताक दिनी झाली. पण २५ वर्षांमध्ये या नाटकासाठी शरद पोंक्षेंना एकही पुरस्कार मिळाला नाही. बऱ्याचदा शरद पोंक्षेंनी याची खंत व्यक्त केली. आता ज्येष्ठ अभिनेते संजय मोनेंनी देखील पुरस्कार न देण्याबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
हेही वाचा – “शरद पोंक्षेसारखं धैर्य खूप कमी लोक दाखवतात”, संजय मोनेंचे विधान; म्हणाले, “छोटी-मोठी काम करत…”
संजय मोनेंनी नुकतीच ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना विचारलं गेलं की, शरद पोंक्षेंचं ‘नथुराम गोडसे’ नाटक न पाहणं किंवा त्याला कुठलाही पुरस्कार न देणं, हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? संजय मोने म्हणाले, “चूक आहे. तुम्ही हलवाईशी वैर धरा, त्याला शिव्या घाला, त्याला वाटेल ते करा, पण मिठाई प्रेमाने खा. मिठाईशी वैर करू नका. त्याने उत्तम काम केलं होतं. त्याला पुरस्कार द्या. अभिनय आवडला, यासाठी कुठल्या परीक्षकाला प्रतिगामी कोणी म्हणणार नाही. निदान तसं म्हणू नये. आपल्याकडे बहुतेक तशी प्रथा नसावी, पण त्याला पुरस्कार दिला पाहिजे होता. केवळ त्याच्या त्या धैर्यापायी तरी विशेष पुरस्कार द्यायला पाहिजे होता. काम तर तो उत्तम करायचाच.”
“बरं त्याच्या नथुराम नाटकाचा मी पहिला आणि शेवटचा प्रयोगही बघितला होता. दरम्यानच्या काळात आधी माझा प्रयोग असेल तेव्हा मी ते नाटक बघण्यासाठी पोहोचायचो आणि गुंग होऊन बघत राहायचो. त्याची ती संवादफेक आणि सर्व काही भारी होतं. माझ्यापेक्षा तो थोडा लहान. पण माझ्या आधीच्या पिढीतले कसलेले नट होते, त्यांची अशी लांब लांब स्वगत. त्याची उभं राहण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, ते दिसताना खूप मोठे दिसायचे. भव्यदिव्य दिसायला लागायचे. बरं त्या नटांना उंची वगैरे अधिक नसायची. डॉ. घाणेकर तसे बुटके होते, आमचा अतुल परचुरे त्याला उंची नाही, पण तो असा हिमालय वाटतो. आम्ही त्याला साहेब म्हणतो. साहेब खरंच मोठा कलाकार आहे. तर भूमिकेला उंची वगैरे नसते तर त्याला तुमचं ते जे असणं असतं ते पाहिजे असतं. शरद पोंक्षेकडे ते आहे, त्याला पुरस्कार द्यायला हवा होता. मी जर त्या काळात परीक्षक असतो तर मी त्याला नक्की पुरस्कार दिला असता,” असं स्पष्ट संजय मोने म्हणाले.