बहुआयामी पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील इरसाल व्यक्तिरेखा ‘नमुने’ या मालिकेच्या माध्यमातून हिंदी जगतात झळकत आहेत. ‘सोनी सब’ वाहिनीवरील या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पु. ल. देशपांडे यांच्या भूमिकेतील संजय मोनेसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत. पुलंसारखी व्यक्ती मी अजून तरी पाहिलेली नाही, असं ते म्हणतात.
संजय मोने पुलंना जवळून ओळखायचे. ‘ते फारच खुल्या दिलाचे आणि आपल्यासाठी सहज उपलब्ध असणारे होते, त्यामुळे त्यांना हजारो- लाखो लोकं फॉलो करत होते. लोकांचं त्यांच्याबद्दलचं मत ठाम आहे आणि मीसुद्धा भूमिकेबद्दलचं मत तुमच्यावरच सोडणार आहे. खरं तर पुलंच्या भूमिकेसाठी आम्हाला काही तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, पण मी त्यांचं सगळं साहित्य वाचलंय. मी त्यांच्या घरीही वारंवार जायचो. मी त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करणार नाही, पण त्यांचं व्यक्तिमत्त्व मात्र नक्कीच उभं करेन,’ असं ते सांगतात.
पुलंची भूमिका स्वीकारण्यामागचं कारण ते सांगतात की, ‘एक जबरदस्त सर्जनशील माणूस म्हणून ते मला फार आवडतात. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम केलं, सगळ्यांना ते शक्य नसतं. खूप कमी लोकांना ते जमतं. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं, याचं चित्रण मी उभं करत असल्याने, ते अप्रत्यक्षरीत्या मला समाधान देणारंच आहे.’
संजय मोने यांच्या नावामागेही पुलंची कथा आहे. त्यांच्या वडिलांनीही काही वर्षं अभिनय केलं आणि मग ते टेक्सटाइलकडे वळले. संजय मोने यांच्या वडिलांनी पुलंच्या नागपूर इथं झालेल्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकात संजय नावाचं पात्र रंगवलं होतं. ‘माझे वडील या नाटक प्रवासात होते, तेव्हा माझा जन्म झाला. म्हणून माझं नाव संजय ठेवलं’, असं त्यांनी सांगितलं.