उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यामधील वादाला राजकीय वळण मिळालं आहे. या वादावर अनेक राजकीय मंडळी आपलं मत मांडताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे, अमृता फडणवीस या मंडळींनी या वादावर प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे चित्रा वाघ व उर्फीमधील वाद आणखीनच वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान या वादामध्ये आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या ‘मटा कॅफे’ कार्यक्रमात संजय राऊत यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांना चित्रा वाघ व उर्फी जावेद यांच्या वादाबाबत तुमचं मत काय? असं विचारण्यात आलं. यावर त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं.
काय म्हणाले संजय राऊत?
“२०१४ पासून महाराष्ट्रात, देशात हेच सुरू आहे. एखाद्याला पकडायचं, त्याला टार्गेट करायचं. मग ती अभिनेत्री असेल किंवा अभिनेता. त्याची जात, धर्म, पंथ, वक्तव्यावरुन त्यांना टार्गेट करायचं. अत्यंत किळसवाण्या पद्धतीच्या राजकारणाची सुरुवात २०१४पासून झाली. २०२४मध्ये हे सगळं थांबेल.” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
आणखी वाचा – “उर्फीलाही नाचवा…” म्हणत चित्रा वाघ व उर्फी जावेदमधील वादावर अमृता फडणवीसांनी बोलणं टाळलं
दरम्यान चित्रा वाघ यांनी उर्फीला साडी व चोळी पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे उर्फीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक वेगळाच व्हिडीओ शेअर केला. अंगभर कपडे परिधान केल्यामुळे तिच्या शरीरावर त्याचा परिणाम होत असल्याचं उर्फीने म्हटलं आहे. आता हा वाद आणखीन कितपत वाढणार हे पाहावं लागेल.