शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांना भेटीला येणार आहे. काही आठवड्यांपूर्वीच या सिनेमाचा हिंदी तसेच मराठीमधील ट्रेलर मुंबईमधील एका सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लॉन्च करण्यात आला. मात्र मराठी ट्रेलरमधली सर्वांत महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना खटकली ती म्हणजे बाळासाहेबांचा आवाज. अनेकांना हिंदीमध्ये नवाजुद्दीन सिद्दकीने दिलेला आवाज रुचला असला तरी मराठीमध्ये सचिन खेडेकरने बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी दिलेला आवाज खटकला. अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरून यासंदर्भात स्पष्टपणे मते व्यक्त करत हा आवाज बदलून सिनेमाचे पुन्हा मराठीमध्ये डबिंग करावे अशी मागणी केली. त्यानंतर मराठीमधील सिनेमासाठी आता चेतन शशितल यांचा आवाज देण्यात येणार असल्याची बातमी समोर आली असली तरी त्याबद्दल अधिकृतरित्या कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र पहिल्यांदाच मराठी सिनेमातील बाळासाहेबांच्या आवाजाबद्दल शिवसेना खासदार आणि सिनेमाचे निर्माते संजय राऊत यांनी मत व्यक्त केले आहे. मराठी सिनेमात बाळासाहेबांचा आवाज बदलला जाणार का या प्रश्नाला राऊत यांनी एका मुलाखतीमध्ये उत्तर दिले.

सचिन खेडेकर यांनी दिलेल्या आवाजाबद्दल राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता आपण खेडेकरांच्या आवाजाने समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन खेडेकरांचा आवाज हा उत्तम आहे. त्यांच्या आवाजाला धार आहे वजन आहे असं राऊत म्हणाले. पुढे खेडेकरांच्या आवाज लोकांनी ओळखल्याने त्यांना तो बाळासाहेबांचा आवाज वाटला नाही असंही राऊत म्हणाले. ‘लोकांच्या कानामध्ये बाळासाहेबांचा आवाज नक्की बसला आहे. खेडेकरांचा आवाज एक उत्तम नट म्हणून थेअटर आर्टिस्ट म्हणून उत्तम आहे. मी स्वत: त्या आवाजाबद्दल समाधानी आहे. म्हणजे या सिनेमाशी संबंधित सगळेच लोक खेडेकरांच्या आवाजाबद्दल समाधानी आहोत असे राऊत यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणतात, ‘पण लोकांनी असं म्हटलं की बाळासाहेबांचा खरा आवाज हवा. आता बाळासाहेबांचा खरा आवाज कुठून आणायचाय. बाळासाहेबांचा आवाज म्हणजे त्यांचा विचार आहेत. आम्ही खेडेकरांचा आवाज ट्रेलरपुरता वापरला आहे. त्यांच्या आवाजाचं स्वागतही झालं. काही विशिष्ट लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खेडेकरांचा आवाज आम्ही अनेक वर्षे ऐकतोय पण लोकांनी खेडकांचा आवाज ओळखला.’

बीबीसी मराठीला दिलेल्या या मुलाखतीमध्ये पुढे राऊत यांना, ‘खेडेकरांचा आवाज ट्रेलरपुरता होता सिनेमात वेगळा असेल असं म्हणता येईल का हा प्रश्न विचारण्यात आला. मात्र या प्रश्नाला राऊत यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. ‘आता त्याच्यावर चार किंवा पाच प्रमुख लोकं विचार करत आहोत. आम्ही परदेशातूनही काही डबिंग करणारे लोकं बोलावले आहेत. या आवाजाबद्दल काय करता येईल याचे काम सुरु आहे,’ असे उत्तर राऊत यांनी दिले. सिनेमात वेगळा आवाज असेल का या प्रश्नाला उत्तर देताना ‘पाहुयात’ असं उत्तर देतानाच आम्ही मराठीमधील आवाजावर काम करत असून येत्या दोन तीन दिवसात याबद्दलचा निकाल लागेल अशी माहिती राऊत यांनी दिली.

Story img Loader