मराठी मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही क्षेत्रांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade). सध्या रंगभूमीवर त्याचे ‘नियम व अटी लागू’ (Niyam Va Ati Lagu) आणि ‘तू म्हणशील तसं’ ही दोन नाटके सुरू आहेत. शिवाय तो अभिनेत्री स्पृहा जोशीबरोबर ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रमदेखील करतो. अशातच त्याने नुकतीच त्याच्या आणखी एका नव्या नाटकाची घोषणा केली आणि या नवीन नाटकाचे नाव आहे ‘कुटुंब किर्रतन’ (Kutumb Kirrtan).
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा संकर्षण सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. तसंच कामाबद्दलची माहितीही शेअर करत असतो. सध्या त्याच्या नाटकांना प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशातच त्याने त्याच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाबद्दलची खास पोस्ट शेअर केली आहे. तसंच रंगभूमी दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.
संकर्षणने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पुण्यात आमच्या “नियम व अटी लागू” नाटकाची तिकीट विक्री सुरू झाली होती. आज ‘कुटुंब किर्रतन’ नाटकाची सुरू झाली आहे. तसाच दणक्यात प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या या प्रतिसादामुळेच रंगभूमीवर सतत नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते आणि जबाबदारी वाढते. प्रेक्षक त्यांच्या आयुष्यातले मोलाचे ३ तास आणि तिकिटांसाठी मोजलेले कष्टाचे पैसे देऊन येतात.”
पुढे त्याने प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद देत असं म्हटलं आहे की, “प्रेक्षकांच्या मोलाच्या प्रतिसादाची जाण कायम राहावी आणि हा प्रतिसाद वरचेवर वाढण्यासाठीची पात्रता कलाकार म्हणुन अंगी यावी”. यानंतर त्याने “सगळ्या लेखकांना, कलाकारांना, तंत्रज्ञांना, बॅकस्टेज मंडळींना आणि प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप खूप शुभेच्छा” असंही म्हटलं आहे. संकर्षणने शेअर केलेल्या या फोटोमध्ये प्रेक्षक नाटकाच्या तिकिटासाठी उभे असल्याचे पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, संकर्षणच्या ‘कुटुंब किर्रतन’ या या नवीन नाटकाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. गौरी थिएटर्स व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन निर्मित रांजेकर प्रस्तुत ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक २१ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला अल आहे. या नाटकात त्याच्याबरोबर अभिनेत्री तन्वी मुंडले व वंदना गुप्ते हे कलाकार आहेत. तर या नाटकाची सुरुवातीची अनाऊन्समेंट अभिनेता जितेंद्र जोशीने केली आहे.