मराठी मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही क्षेत्रांत मुशाफिरी करणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade). सध्या रंगभूमीवर त्याचे ‘नियम व अटी लागू’ आणि ‘तू म्हणशील तसं’ ही दोन नाटके सुरू आहेत. शिवाय तो अभिनेत्री स्पृहा जोशीबरोबर ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रमदेखील करतो. अशातच त्याने नुकतीच त्याच्या आणखी एका नव्या नाटकाची घोषणा केली आणि या नवीन नाटकाचे नाव आहे ‘कुटुंब किर्रतन’ (Kutumb Kirrtan Marathi Natak).

संकर्षणच्या या नवीन नाटकाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्रयोगाआधीच नाटकाला सोशल मीडियावर प्रतिसाद मिळत आहे. गौरी थिएटर्स व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन निर्मित रांजेकर प्रस्तुत ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक २१ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यापूर्वी संकर्षणने या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता जितेंद्र जोशीचे (Jitendra Joshi) आभार मानले आहेत. याबद्दल संकर्षणने एक विशेष पोस्टही शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये संकर्षणने असं म्हटलं आहे, “जितेंद्र जोशी… आभार मानायला शब्द नाहीत. नाटकासाठीचा अत्यंत महत्त्वाची… नाटकापूर्वी रंगमंदिरात वाजते ती अनाऊन्समेंट… ‘कुटुंब किर्रतन’ नाटकाची अनाऊन्समेंट कुणी करावी, असं सुरू असताना मनात जितेंद्र जोशी हे नाव आलं… दामलेसरांच्या कानावर घातलं. तेही एका क्षणांत म्हणाले डन… त्यानंतर मी सकाळी ११ वाजता जितेंद्र जोशींना फोन केला. म्हणालो, दादा करशील का रे?”

यापुढे संकर्षणने असं म्हटलं आहे, “आम्ही कधीच एकत्र काम केलं नाही. कधी भेटून शेकहॅंडसुद्धा झाला नाही. पण, पलीकडून उत्तर आलं, “मित्रा… करीन की रे…” मी म्हणालो कधी वेळ मिळेल तुला? उत्तर आलं “आजच जातो”. मी त्यांना लिहिलेली अनाऊन्समेंट पाठवली. त्यात मोलाची भर घालून जोशीबुवांनी जी काही रंगत आणली, ती तुम्हाला नाटकाच्या आधी ऐकायला मिळेल. मी फोन ठेवतांना म्हणालो, कसे आभार मानू? तर समोरून उत्तर आलं “नकोच मानू. कधीतरी तुला पुढचा संकर्षण फोन करेल, त्याला अशीच साथ दे” यावर मी निःशब्द.”

त्यानंतर संकर्षणने या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “काय बोलायचं? नाटकधर्माला जागणारी ही वृत्ती शिकवून येत नाही. मला खूपदा लोक विचारतात “तू मुंबईचा नाहीस. तुला लोकांनी कधी दुजाभाव करून वागवलं का?” त्याचं हे उत्तर… मला या शहरानं आणि माझ्या कामानं अशी माणसं दिली आहेत, जी एका भेटीत एक ४०० पानांचं पुस्तक वाचल्याचा आनंद देतात. मी हे कधीही विसरणार नाही. जितेंद्र जोशी तुम्ही तुम्ही कमाल केलीत.”

दरम्यान, संकर्षणची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेक चाहत्यांनी दोन्ही कलाकारांच्या नाटकाबद्दलच्या आदराचं कौतुक केलं आहे. तर संकर्षणच्या या नवीन नाटकाबद्दल बोलायचं झालं तर यात त्याच्याबरोबर अभिनेत्री तन्वी मुंडले व वंदना गुप्ते हे कलाकारही असणार आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना या नवीन नाटकाची उत्सुकता लागून राहिली आहे.