कोणत्या ना कोणत्या कारणाने कलाकारांची नेहमीच चर्चा रंगलेली दिसते. आता अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शाळेतील शिक्षिकेकडून बक्षीस मिळाल्याची पोस्ट शेअर केली होती, त्यावर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स चर्चेत आहेत.
संकर्षण नुकताच आपल्या कवितांच्या कार्यक्रमासाठी अमेरिका दौऱ्यावर गेला होता. यादरम्यान त्याला शाळेत मराठी शिकविणाऱ्या शिक्षिकेने त्याला त्याच्या कवितांसाठी बक्षीस दिल्याची पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. “मराठी शिकविणाऱ्या जपेबाई मला वर्गात उठवून मला अक्षरात सुधारणा करण्याविषयी, शुद्धलेखन करण्याविषयी सतत सांगायच्या. प्रेक्षकांना भेटताना तसा मी शांत असतो; मात्र जपेबाई जेव्हा भेटायला आल्या तेव्हा खरेच भीती वाटली. आज माझी शब्दांशी असलेली मैत्री फक्त जपेबाईंमुळे आहे. शाळेत मी कधी हुशार नसल्यानं मला कधी बक्षीस मिळाल्याचं आणि त्यासंबंधी घरी पळत जाऊन आई-बाबांना आनंदानं सांगण्याचं सुख कधी मिळालं नाही. पण आज आई-बाबा, बायको आणि माझ्या छोट्या मुलांनाही सांगतो की, माझ्या बाईंनी मला बक्षीस दिलं”, असे संकर्षणने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, हे लिहिताना त्याने व्याकरणाच्या बऱ्याच चुका केल्या आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला शुभेच्छा देतानाच अभिनेत्याने अशुद्ध लिहिल्यामुळे मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
…. अशी आहे संकर्षणची पोस्ट
माझ्या शाळेच्या “मराठीच्या बाईंनी मला बक्षीस दिलं हो…” माझ्या परभणीतल्या शाळेत मला मराठी शिकवायला याच जपेबाई होत्या. नेहमी मला वर्गात उठवायच्या आणि
“कऱ्हाडे, धडा वाच…, कऱ्हाडे, अक्षर अतिशय घाण आहे…, तुझं ऱ्हस्व-दीर्घ कधी सुधारणार…??? असं म्हणायच्या…
पोरांना शिकायचा कंटाळा आला (जो नेहमीच आलेला असायचा) की त्या, “कऱ्हाडे… गाणं म्हण” असं म्हणायच्या… आज त्याच माझ्या मराठीच्या बाई कवितांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत आल्या आणि त्यांनाी मला कवितांसांठी बक्षीस दिलं. मला खूप भरून आलं.
प्रेक्षकांना भेटतांना तसा मी शांत उभा असतो; पण बाई भेटायला आल्या आणि मला खरंच भीती वाटली…
माझी आज शब्दांशी “जर मैत्री असेल… तर ती बाईंनीच करून दिलीये…“
हे नातं तेव्हाचं आहे जेव्हा शाळेतल्या बाईंना “बाईच” म्हणायचो..
समजा, शाळेतले गुरुजी… भाजी मंडईत जरी दिसले तरी भीती वाटायची… आणि घाबरून चालत्या सायकलवरून उडी मारायचो…
अभ्यासात मी कधीच हुशार नव्हतो आणि त्यामुळे तेव्हा बक्षीस मिळवून घरी पळत जाउन आई-बाबांना ते आनंदानं सांगण्याचं सुख कधी मिळालं नाही… पण आज सांगतो आई-बाबांना, बायको आणि माझ्या छोट्या मुलांनाही, “माझ्या बाईंनी मला बक्षीस दिलं.”
काय म्हणाले नेटकरी?
संकर्षणच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने, “जपेबाईंनी ही पोस्ट वाचू नये याची काळजी घ्या. ऱ्हस्व-दीर्घाच्या चिक्कार चुका आहेत”, असे म्हटले आहे. तर दुसऱ्याने, “व्वा कऱ्हाडे सुंदरच! पण, ही कॅप्शन बाईंनी वाचल्यावर रागावणार बघा. किती ती ऱ्हस्व-दीर्घची गडबड”, असे म्हटले आहे.
संकर्षणचे नेटकऱ्यांना उत्तर
नेटकऱ्यांनी संकर्षणच्या व्याकरणातील चुका काढल्यानंतर आणि इतक्या चुका असलेली पोस्ट बाईंनी वाचली, तर त्या रागावतील, असे म्हटल्यानंतर संकर्षणनेदेखील उत्तर दिले आहे. त्याने नेटकऱ्यांच्या कमेंटसना उत्तर देताना, “ऱ्हस्व-दीर्घ काही सुधारत नाही. बक्षीस पोस्टसाठी नाही; तर कार्यक्रमासाठी मिळालंय”, अशी मजेशीर उत्तरं दिली आहेत.
दरम्यान, संकर्षण कऱ्हाडे आपल्या अभिनयासोबतच एक संवेदनशील कवी म्हणूनही ओळखला जातो. सध्या तो झी मराठी वाहिनीवरील ड्रामा ज्युनियर्स या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणून काम करीत आहे.