मराठी प्रेक्षकांना आतापर्यंत प्रियदर्शनच्या हिंदी चित्रपटांची सवय, नव्हे चटक लागली आहे. मात्र आता तीच ‘प्रियदर्शनी’ धमाल चक्क मराठीत अनुभवण्याची संधी विशाल इनामदार दिग्दर्शित ‘संशयकल्लोळ’ या चित्रपटाद्वारे मिळणार आहे. संशयामुळे नात्यात उडणाऱ्या गोंधळाची मजेदार खिचडी विशालने आपल्यासमोर आणली आहे..
विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया आहे असं कितीही सांगितलं जात असलं, तरीही प्रेमामुळे आलेल्या अधिकाराच्या जाणिवेपोटी विश्वासाऐवजी संशय बळावत जातो. संशयाचं हे पिशाच्च एकदा का मानगुटीवर बसलं की, नात्यांची वाट लावल्याशिवाय डोळ्यांवरची झापडं उघडत नाहीत. ही साधी, सरळ पण तेवढीच गंभीर गोष्ट दिग्दर्शक विशाल इनामदार याने ‘संशयकल्लोळ’ या चित्रपटाद्वारे खूपच हलक्याफुलक्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हा प्रयत्न यशस्वीदेखील झाला आहे.
जयसिंह (अंकुश चौधरी) हा एक फॅशन फोटोग्राफर आहे. त्याची बायको आशा (गौरी निगुडकर) त्याच्या स्टुडिओच्या समोरच एक बुटिक चालवते. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच दोघंही एकमेकांचा संशय घेतात. हे संशयाचं भूत इतकं मोठं झालं आहे की, आशाने जयसिंहच्या स्टुडिओत आणि जयसिंहने आशाच्या बुटिकमध्ये चक्क छुपा कॅमेरा बसवला आहे. दुसऱ्या बाजूला शहरातील एक तरुण व्यावयायिक धनू म्हणजे धनंजय (पुष्कर श्रोत्री) मालिकांमध्ये हिरॉइनचं काम करणाऱ्या श्रावणीच्या (मृण्मयी देशपांडे) प्रेमात अडकला आहे. या दोघांनी एकमेकांकडे आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर धनूच्याही मानगुटीवर संशयाचं पिशाच्च बसतं.
दरम्यान, श्रावणी जयसिंहच्या स्टुडिओत फोटोशूटसाठी येते. त्याच वेळी तिला चक्कर येते आणि जयसिंह तिला आधार देऊन एका सोफ्यावर बसवतो. हा सगळा प्रकार आशा कॅमेऱ्याद्वारे बघत असते आणि तिला भलताच संशय येतो. जयसिंह तिला डॉक्टरांकडे न्यायचं म्हणून भुजंगरावांच्या (संजय खापरे) रिक्षेत बसवतो. तर भुजंगराव त्यांना थेट प्रसूतिगृहात घेऊन जातात. आशा त्यांचा पाठलाग करते आणि त्या दोघांना प्रसूतिगृहात शिरताना पाहून हैराण होते. इकडे धनूने दिलेलं लॉकेट श्रावणी जयसिंहच्या स्टुडिओत विसरते. ते नेमकं आशाच्या हाती पडतं आणि हे लॉकेट जयसिंहनेच तिला दिलंय, असा तिचा समज होतो. लॉकेट हातात घेऊन आपल्या बुटिकमध्ये बसलेल्या आशाला जयसिंह छुप्या कॅमेऱ्याद्वारे बघतो आणि त्याला भलताच संशय येतो. जयसिंह आशाच्या नकळत ते लॉकेट मिळवतो आणि त्या लॉकेटच्या पेण्डण्टमध्ये असलेला धनूचा फोटो बघतो. नात्यांमधील हा संशयकल्लोळ अखेर सुटतो पण तो चक्क प्रियदर्शन स्टाइलने! एका रात्री जयसिंहच्या स्टुडिओत सगळीच पात्रं वेगवेगळ्या कारणांनी एकत्र जमतात आणि बऱ्याच गोंधळानंतर संशयाचे काळे ढग बाजूला होतात.या चित्रपटाच्या कथा विस्तारात आणि पटकथा लेखनात दिग्दर्शक विशाल इनामदारचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे त्याला हा सगळा पसारा आणि गोंधळ कसा आवरायचा, हे अगदी व्यवस्थित कळलेलं आहे. साधारणपणे असे चित्रपट दिग्दर्शकाच्या हातातून निसटतात आणि त्यांचं भजं होतं. सुदैवाने ‘संशयकल्लोळ’चं भजं न होता गरमागरम खमंग मिसळ झाली आहे. संजय मोने आणि विजय पटवर्धन यांच्या खुसखुशीत संवादांनी या मिसळीत फरसाणाइतकी आवश्यक भूमिका बजावली आहे. अशा गंभीर विषयाची हाताळणी हलक्याफुलक्या पद्धतीने करताना संवादही तसेच हलकेफुलके लिहिले आहेत. संवादांमध्ये कुठेही नाटकीपणा वाटत नाही किंवा ते खोटेही वाटत नाहीत.
दिग्दर्शनाच्या बाजूतही ‘संशयकल्लोळ’ चांगला जमला आहे. विशाल इनामदार याने नात्यांचा हा गडबडगुंडा गुंता होणार नाही, या पद्धतीनेच हाताळला आहे. काही काही ठिकाणी तर दिग्दर्शकाचा ठसाही त्याने उमटविला आहे. आशाची वकील असलेली मैत्रीण विशाखा (सुलेखा तळवलकर) सतत आशाला जयसिंहच्या विरोधातल्या गोष्टी सांगत असते. या प्रत्येक प्रसंगात विशाखाच्या हाती तेल दिलं आहे आणि ते तेल विशाखा कोणत्या ना कोणत्या पदार्थात टाकताना दाखवली आहे. ‘आगीत तेल ओतणे’, या म्हणीचा उत्तम वापर दिग्दर्शकाने दृश्य स्वरूपात केल्याचे दिसते. त्याशिवाय त्याने उभी केलेली चैत्रा आणि मिथुन ही पात्रंही लाजवाब आहेत. संकलनाच्या बाबतीत मात्र एका ठिकाणी संकलकाला डुलकी लागली की काय, असं वाटून जातं. बाकी,उत्तम! कौशल इनामदार याने या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. पाश्र्वगीत म्हणून संपूर्ण चित्रपटभर आपल्याला ऐकू येणारं ‘गडबडगुंडा’ हे गाणं खूपच चांगलं जमलं आहे.
अशा प्रकारच्या चित्रपटासाठी आवश्यक असणारं हलकंफुलकं आणि धम्माल संगीत देण्याचं भान कौशलनं बाळगलं आहे. ‘बालगंधर्व’मधील अभिजात संगीत देणाऱ्या कौशलचं हे हलकंफुलकं संगीत चित्रपटाची जमेची बाजू आहे.चित्रपटातील सर्वच पात्रांनी आपापल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. या चित्रपटात मृण्मयीला गाजलेल्या मालिकेची हिरॉइन हे ‘ऑन स्क्रीन’ पात्र आणि श्रावणी हे ‘ऑफ स्क्रीन’ पात्र, अशी दुहेरी भूमिका साकारायची होती. त्यातला फरक तिने संवादफेकीतून दाखवून दिला आहे. पुष्कर श्रोत्रीसाठी ही भूमिका म्हणजे फारसं आव्हान नसावी. कारण त्याने ज्या लीलया ही भूमिका केली आहे, त्याला तोड नाही. धनूचा भाबडेपणा, सरळ स्वभाव त्याच्या चेहऱ्यावर लख्खं दिसतो. गौरी निगुडकरने संवादफेकीकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. तर अंकुश चौधरी काही सीन्समध्ये ओव्हर रिअॅक्ट झाल्यासारखा वाटतो. पण तरीही या दोघांनी चांगली कामं केली आहेत.
धनूच्या आईच्या भूमिकेत रिमा यांनीही छोटेखानी भूमिका साकारली आहे. मात्र विशेष रंगत आणली आहे ती मिथुनची भूमिका करणाऱ्या ओंकार गोवर्धन, चित्राच्या भूमिकेतील क्षिती जोग आणि भुजंगरावच्या भूमिकेतील संजय खापरे यांनी! या तिघांमुळे हा गडबडगुंडा आणखीनच मजेदार झाला आहे. या चित्रपटातील अनाकलनीय आणि तरीही सतत दिसणारं पात्र (पुतळा) म्हणजे झोम्बोरोस्की! हा पुतळा आणि त्याचा उल्लेख सतत का केला आहे, हे कदाचित दिग्दर्शकच जाणे! नात्यांचा हा गडबडगुंडा एकदा पाहायला काहीच हरकत नाही. पण एक वैधानिक इशारा.. नव्याने लग्न झालेल्यांनी हा चित्रपट पाहण्याआधी दहा वेळा विचार करा! चित्रपट पाहून ‘संशय घेऊ नये,’ हा धडा घेणार असलात, तर ठीक! नाहीतर तुमच्या संसाराची धडगत नाही.
श्री स्वामी समर्थ पिक्चर्स निर्मित
‘संशयकल्लोळ’
कथाविस्तार व दिग्दर्शन – विशाल इनामदार, पटकथा – विशाल इनामदार, राजेश कोलन, विजय पटवर्धन, संवाद – संजय मोने आणि विजय पटवर्धन, छायालेखन – सुदेश देशमाने, संगीत – कौशल इनामदार, कलाकार – अंकुश चौधरी, गौरी निगुडकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री, क्षिती जोग, ओंकार गोवर्धन, संजय खापरे, रिमा, सुलेखा तळवलकर आणि इतर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा