१३ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सव यंदा १४ ते १६ मार्च या कालावधीत प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर सभागृहात रंगणार आहे. १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता ‘टूरिंग टॉकिज’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ‘तुकाराम’, ‘मोकळा श्वास’ या चित्रपटांचा आस्वाद रसिकांना महोत्सवाच्या पहिल्या दिवशी घेता येणार आहे.
१५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता ‘मसाला’, सायंकाळी ५.३० वाजता ‘धग’, आणि रात्री ८.३० वाजता ‘बालक पालक’ हे चित्रपट पाहता येतील. तर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, १६ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता ‘इन्व्हेस्टमेंट’, दुपारी १ वाजता ‘अजिंठा’, दुपारी ३.३० वाजता ‘३५ मिनिट्स’ हे दाखविण्यात येणार आहेत. सायंकाळी ७.३० वाजता होणाऱ्या ‘आयना का बायना’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत ४९ चित्रपटांनी सहभाग घेतला होता. त्यातून सात चित्रपटांची निवड होणार होती. परंतु स्पर्धा चुरशीची झाल्याने परीक्षकांना सातऐवजी १० चित्रपटांची निवड करावी लागली. तसेच सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी यंदा १० चित्रपटांची निवड झाली असली, तरी इतर पुरस्कारांसाठी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व चित्रपटांचा विचार केला जाणार आहे.
दिलीप ठाकूर, प्रमोद पवार, प्रदीप कबरे आणि अमित भंडारी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे व कार्याध्यक्ष अर्चना नेवरेकर यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanskruti kala darpan film festival will begin from 14 to 16 march