कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे २९ ऑक्टोबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. आता पुनीत यांच्यासोबत ‘युवारथना’ या सुपरहिट चित्रपटात काम करणारे निर्माते संतोष आनंदराम यांनी पुनीत यांच्या बायोपिक विषयी वक्तव्य केले आहे.
संतोष यांना सोशल मीडियावर एका चाहत्याने पुनीत कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याची विनंती केली होती. त्या चाहत्याला उत्तर देत त्यांनी ‘पुनीतचा बायोपिक पडद्यावर आणण्यासाठी मी माझ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करेन’ असे म्हटले आहे.
आणखी वाचा: पुनीत राजकुमार यांच्या निधनानंतर चाहत्यांना धक्का; एकाची आत्महत्या, तर दुसऱ्याला हृदयविकाराचा झटका
पुनीत राजकुमार हे कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.
पुनीत २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अप्पू या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आले होते. त्यांनी आतापर्यंत कन्नडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभि, वीरा कन्नडिगा, अजय, अरासू, राम, हुदुगारू आणि अंजनी पुत्र या चित्रपटात काम केले आहे.