सिनेविश्वात सध्या ‘छावा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांकडून या चित्रपटाचे कौतुक होत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्यासह या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी अभिनेता संतोष जुवेकरही चर्चेत आला आहे. त्याने या चित्रपटात रायाजी यांची भूमिका साकारली आहे. अशात संतोष या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतेच त्याने मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर जास्त का चालत नाहीत यावर मत व्यक्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

” ‘केजीएफ’ लोकांना का आवडला हे मला अजून समजलेलं नाही…”

संतोष जुवेकरने नुकतीच ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याला “मराठी चित्रपट पाहण्यासाठी सध्या जास्त प्रेक्षक नाहीत. यात चूक कुणाची?”, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर संतोष म्हणाला, “प्रेक्षक किंवा दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यात कुणाची एकाची चूक आहे, असं मला वाटत नाही. अनेक सिनेमे येतात, त्यात सगळेच चांगला बनवतात असं नाही. काही चित्रपट हवे तसे बनत नाहीत. साऊथचेही सगळेच चित्रपट चांगले आहेत, असं नाही. ‘आरआरआर’ व ‘केजीएफ’ लोकांना का आवडला हे मला अजून समजलेलं नाही. हे चित्रपट चालवतं कोण? १०० पैकी ४० टक्के व्यवसाय महाराष्ट्र देत आहे.”

संतोष पुढे मराठी चित्रपट न चालण्याचं कारण सांगत म्हणाला, “मी प्रेक्षकांना जबाबदार नाही ठरवत. पण, एक कन्नड व्यक्ती त्याच भाषेतील चित्रपट पाहते. तसेच मल्याळम व्यक्ती त्याच्याच भाषेतील सिनेमा पाहतो. ते इतर भाषांमधील चित्रपट पाहत नाहीत.” पुढे याचे उदाहरण देताना संतोषने सांगितले, “तुम्ही चेन्नई किंवा हैदराबादमध्ये गेलात, तर तिकडच्या चित्रपटगृहांमध्ये त्यांच्याच भाषेतील चित्रपट असतात. तिथे मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटसुद्धा लागत नाहीत.”

“आपल्याकडे बजेटच नाही…”

मराठी चित्रपट न चालण्याबद्दल सांगताना संतोष पुढे याच्या बजेटवरसुद्धा बोलला. तो म्हणाला, “कोणीच वाईट चित्रपट बनवायचा म्हणून बनवत नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या परीनं चांगलाच चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करते. आपल्याकडे बजेटच नाही. आपण एखादा चार कोटींपर्यंतचा चित्रपट करायचा ठरवला तरी लोकांना वाटतं की, या चिपटातून नफा कसा मिळणार. नफा अजिबात मिळालाच नाही, तर काय करणार? त्यामुळे मला वाटतं की, आपला मराठी सिनेमा व्हेंटिलेटरवर आहे. काही दिवसांनी मला नाही वाटत की, मराठी सिनेमा बनेल.”

“आस्था आणि आपुलकीचा प्रश्न…”
“मराठी किंवा हिंदी चित्रपट साऊथमध्ये डब होऊन जात नाहीत. त्यामुळे इथे आस्था आणि आपुलकीचाही प्रश्न आहे.” चांगले चित्रपट बनवा. तसे विषय घेऊन या, मगच चित्रपट चालतील, असे अनेक प्रेक्षक बोलतात. त्यांनाही संतोषने उत्तर दिले आहे. “मला त्यांना सांगायचं आहे की, तुम्ही या आणि चित्रपट बनवा. किंवा तुम्ही तसे विषय सुचवा”, अशा शब्दांत संतोषने टीका करणाऱ्यांनाही उत्तर दिले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh juvekar expresse his opinion on marathi films not making much profit at the box office rsj