मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकरने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘झेंडा’, ‘मोरया’ यांसारख्या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली. संतोष सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. वेगवेगळ्या विषयांवर संतोष त्याचं मत मांडत असतो. कधी मराठी चित्रपटाविषयी तर कधी ट्रोलिंगबद्दल तो त्याची भूमिका लोकांसमोर मांडत असतो.
नुकतंच संतोषने निर्माते महेश पटेल आणि ‘सैराट’फेम आकाश ठोसरसह उज्जैनमधील महाकाल आणि कालभैरवाचे दर्शन घेतले. याबद्दलच एक पोस्ट संतोषने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये संतोषने त्याला या देवस्थानाला भेट दिल्यावर आलेल्या अनुभवाबद्दल लिहिलं आहे. त्यांनी मंदिरात राहून पूजा केली अन् अभिषेकही केला.
आणखी वाचा : “शाहरुखने ‘पहेली’ची कथा ऐकल्यावर सिगारेट शिलगावली अन्…” अमोल पालेकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा
आपल्या पोस्टमध्ये संतोष म्हणतो :
“आमच्या महेश दादामुळे सध्या अनेक देवस्थानांच्या दर्शनाचं पुण्य मला मिळतंय. काल पहिल्यांदा उज्जैन येथे महाकाल आणि काल भैरवनाथचे दर्शन घेतलं.अगदी अभिषेक सुद्धा करायला मिळाला. मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही पण एक वेगळीच ऊर्जा जाणवली त्याच्या गाभाऱ्यात तशीच ऊर्जा मला अनेक मंदिरात जाणवली आहे. मी चर्च मध्येसुद्दा जातो गोव्यात गेलो की काही जुनी चर्च आहेत मला आवडतं तिथे जायला. मी दरग्यातही जातो नाशिकहून ठाण्याकडे येताना घाट संपला की डाव्या बाजूला एक दर्गा आहे मी न चूकता त्या दरग्यात जातोच जातो. त्या चर्च आणि दर्ग्यातही मला तीच ऊर्जा जाणवते आणि ती सकारात्मक ऊर्जा कायम आपल्या सोबत रहावी ही प्रार्थना मी करतो कायम. पण मला आज त्या मंदिरातल्या देवाला त्या चर्च मधल्या येशूला आणि त्या दरग्यातल्या अल्ल्हाला सांगायचंय तुझ्या गाभाऱ्यात ही जी सकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्ण विश्वात भरुदे हा सुद्धा तुझाच तर गाभारा आहे ना.”
या संपूर्ण व्हिडीओमध्ये संतोष आणि आकाश मनोभावे पूजा करताना दिसत आहे शिवाय यासाठी त्यांनी पारंपरिक वस्त्रंही परिधान केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोकांनी संतोषच्या या पोस्टवर त्याच्या लिखणाचं आणि विचारांचं कौतुक केलं आहे, तर काहींनी सवयीप्रमाणे त्याला ट्रोल केलं आहे.