हरयाणामधील सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी कायमच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि तिच्या वर्तनामुळे चर्चेत राहिली आहे. सपना एक उत्तम नृत्यांगना असून तिने आतापर्यंत अनेक शोजमध्ये सहभागही घेतला आहे. सध्या सपनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सपना ‘मुलींना कधीही डान्सर होऊ देऊ नका’, असा सल्ला पालकांना देतांना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये सपनाने तिचा डान्सर होण्यापर्यंतच्या प्रवासाचं वर्णन केलं आहे. यामध्येच तिने कधीही आपल्या मुलींना डान्सर करण्याचं स्वप्न पाहू नका, त्यांना चांगलं शिक्षण द्या, मोठं करा असा सल्ला दिला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सपना डान्स परफॉर्मन्स केल्यानंतर स्टेजवर बसून प्रेक्षकांशी गप्पा मारताना दिसत आहे. सपनाला खाली बसलेलं पाहून एक लहान मुलगी तिच्या जवळ येते आणि तिला आपल्यासोबत डान्स करण्याची विनंती करते. त्या लहान मुलीला पाहून सपना तिच्या आई-वडीलांना एक मोलाचा सल्लाही देते. “जर तुम्ही तुमच्या मुलीला डान्सर करण्याचं स्वप्न पाहत असाल. तर कृपा करुन असं स्वप्न पाहू नका. एक डान्सर होणं सोपं काम नाहीये. यात अनेक अडचणी येतात. तिला शिकवा,मोठं करा, पण डान्सर करु नका”, असं सपना म्हणाली.

पुढे ती म्हणते, “डान्सर होणं सोपं नाहीये. यात अनेक अडचणी येतात. मी या साऱ्यातून गेले आहे. येथे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्रत्येकामध्येच एवढं सहन करण्याची ताकद नसते. त्यामुळे मला कधी कधी वाटतं की जगातून डान्सर ही संकल्पनाच नष्ट व्हावी”.

दरम्यान, यावेळी सपनाने तिचं दु:ख साऱ्यांसमोर मांडल्याचं एकंदरीत दिसून आलं. लोकांच्या अवहेलना सहन केल्या, त्यांच्याकडून अश्लील कमेंट ऐकल्या आहेत. मात्र या साऱ्याला सपना मोठ्या धीराने सामोरी गेली आहे. त्यामुळेच आज तिचे असंख्य चाहते आहेत.