अभिनेत्री सारा अली खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मग तिचा पहिला चित्रपट असो किंवा कार्तिकसोबत अफेअरच्या चर्चा, सोशल मीडियावर सारा कधीच मागे नसते. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. पण साराच्या एका गोष्टीमुळे सध्या काही नेटकरी तिच्यावर नाराज आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्यात साराने शाहरुख खानला ‘अंकल’ म्हटल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

सार्वजनिक कार्यक्रमात शाहरुखला ‘अंकल’ म्हणणं चुकीचं आहे असं एका युजरने म्हटलं. तर तुझ्यापेक्षा मोठ्या कलाकारांना सर किंवा मॅडम म्हणून हाक मारण्याऐवजी असं अंकल म्हणणं अव्यावसायिक असल्याचं मत दुसऱ्याने मांडलं. काहींनी तर तिच्या स्टारकिड असण्यावरूनही टीका केली. दुसरीकडे साराच्या चाहत्यांनी तिची बाजू घेतली आहे. ‘साराने तिच्या वडिलांच्या वयाच्या कलाकाराला अंकल म्हटल्यास काय चुकलं,’ असा प्रतिप्रश्न साराच्या चाहत्याने केला. या संपूर्ण प्रकरणात अद्याप शाहरुख किंवा साराने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

साराने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या दोन चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारली आहे. अल्पावधीतच तिने प्रेक्षकांची मनं जिंकली असून एखाद्या सुपरस्टारइतकाच तिचा स्टारडम आहे. यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात तिला सर्वोत्तम डेब्यु अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

Story img Loader