होय. सगळे साराभाई परत आलेत. भोळसट इंद्रवदन, आढय़ताखोर माया, भयंकर कविता करणारा रोसेश, सगळ्या गोष्टींचे मध्यमवर्गीय हिशेब करत सासूचे टोमणे खाणारी मोनिषा आणि आई आणि बायको यांच्यात गंडलेला साहिल.. तुमच्या-आमच्या कुणाच्याही घरात असू शकणारी ही मंडळी. छोटय़ा पडद्यावर ती होती साराभाईंच्या घरात. सगळा वेळ एकमेकांना टोमणे मारणं, एकमेकांच्या खोडय़ा काढणं, आपलंच घोडं पुढे दामटणं यात ती सगळी इतकी मश्गूल असायची की, त्यांना इतर टीव्ही मालिकांमधल्या व्यक्तिरेखांप्रमाणे एकमेकांविरुद्ध भलभलती कटकारस्थानं करायला वेळच नसायचा. त्यांची भांडणं, रुसवेफुगे, हेवदावे असायचे ते टॉम अ‍ॅण्ड जेरीसारखे. ही सगळी मंडळी तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना प्रकारातली. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी कुठल्याही घरात असेल अस त्यांचं वागणं. किंवा मांजराची पिल्लं एकमेकांशी भांडणाचा खेळ खेळतात तसं त्यांचं भांडण. म्हणजे खेळ खेळायचा तर आहे, त्यात प्रत्येकाला जिंकायचं तर आहे, त्यासाठी दुसऱ्याला पाडायचं, मारायचं, बोचकारायचं तर आहे, पण कुणालाही कुणाचेही दात, नखं लागणार नाही असं. साराभाईंच्या घरातलं ते सगळ्यांचंच एकमेकांशी असलेलं नातं इतकं लोभस होतं की कुणीही त्यांच्या प्रेमात पडावं.

असंच लोभस कुटुंब त्याआधी पाहायला मिळालं होतं ते ‘देख भाई देख’मध्ये. दूरदर्शनवर १९९३ मध्ये दाखवली गेलेली ही निखळ विनोदी मालिका. एकत्र कुटुंबातल्या गमतीजमती दाखवताना सुषमा सेठ, नवीन निश्चल, शेखर सुमन, फरिदा जलाल, भावना बलसावर यांनी या मालिकेत धमाल केली होती. हाच वारसा तेवढय़ाच ताकदीने पुढे चालवला १९९५ मध्ये आलेल्या ‘हम पाँच’ने. झी टीव्हीवर दाखवल्या गेलेल्या या मालिकेचे दोन सीझन झाले. पाच मुलींचा बाप असलेला एक मध्यमवर्गीय माणूस, त्याच्या सगळ्याचा अर्क असलेल्या डॉली, काजलभाईसारख्या पाच मुली, भिंतीवरच्या तसबिरीतून सतत त्याला उपदेश करणारी त्याची आधीची बायको आणि त्याला सतत धारेवर धरणारी पण मुळात प्रेमळ अशी आत्ताची बायको.. ही सात माणसं एकत्र आल्यावर या मालिकेत धमाल करण्यासाठी आणखी कुणी असण्याची गरजच नव्हती.

या दोन्ही बेफाम मालिकांच्या पंक्तीला बसण्याचा मान २००४ मध्ये ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ला मिळाला तो तेवढय़ाच सशक्त व्यक्तिरेखा, दमदार पटकथा आणि त्यातून निर्माण झालेल्या विनोदनिर्मितीमुळे. ‘देख भाई देख’ आणि ‘हम पाँच’प्रमाणे ‘साराभाई’लाही लोकांनी डोक्यावर घेतलं. सगळ्या कुटुंबाने एकत्र बसून बघावं असा निखळ विनोदाचा झरा अध्र्या तासाच्या कालावधीत टीव्हीच्या पडद्यावर मांडणं, दोन-दोन वर्षे म्हणजे शंभरेक भागांमध्ये त्यातली एनर्जी टिकवणं हे किती अवघड आहे, हे नंतरच्या अनेक तथाकथित विनोदी मालिकांनी सिद्ध केलं आहे. ‘साराभाई’चं यश दिसतं ते या पार्श्वभूमीवर.

दोन वर्षे चालल्यानंतर ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ बंद झाली. पहिल्या भागाच्या शेवटी त्या सगळ्यांच्या बोलण्यावरून ‘साराभाई’चा सिक्वेल येणार असा अंदाज प्रेक्षकांना होताच. तसा आता तो आला आहे. आणि तोही वेबसीरिज या स्वरूपात. ‘साराभाई’चा पहिला सीझन स्टार वन या चॅनेलवर प्रदर्शित झाला होता. पण आता तो हॉटस्टारवर दर आठवडय़ाला प्रदर्शित होणार आहे. गेल्या दहा-बारा वर्षांतल्या माध्यमांतराची ही अर्थातच झलक आहे. दिवाणखान्यातला टीव्ही हे सगळ्या कुटुंबाचं आकर्षकेंद्र बदलून आता हातातला मोबाइल कसा महत्त्वाचा आहे, हेच त्यातून दिसतं. दुसरं म्हणजे आवडत असो वा नसो, घरात सर्वानुमते जे पाहिलं जाईल, ते पाहत बसण्याशिवाय बाकीच्यांना पर्याय नसायचा. पण आता वेब सीरिजमुळे प्रत्येक जण त्याच्या हातातल्या मोबाइलवर त्याला जे हवं ते पाहू शकतो. अशा काळात सगळे ‘साराभाई’ परत आलेत.
अर्थात त्यांच्यात एकाची भरही पडली आहे. ती आहे, अर्णव उर्फ गुड्डू या साहिल आणि मोनिषाच्या सात वर्षांच्या मुलाची. बाकी सगळे साराभाई जसेच्या तसेच आहेत. तसं आढय़ताखोर मायाच्या केसांमध्ये पिकलेपण दिसायला लागलंय. पण तिचा तो उच्चवर्गीय तोरा जरासुद्धा कमी झालेला नाही. मध्यमवर्गीय हिशेब करत बसण्याची मोनिषाची खोड अजूनही तशीच आहे आणि तिच्या या सवयीवरून तिला सतत शब्दांनी बोचकारताना तिची सासू माया अजूनही दमत नाही. रोसेशच्या कविता अजूनही तितक्याच भयंकर आहेत आणि अजूनही तो तसाच आईच्या पदराला लटकलेला आहे. नाही म्हणायला घरात त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे या पात्रांमध्ये आणखी एका पात्राची भर पडण्याची शक्यता दिसते आहे. ही मंडळी जशीच्या तशी असल्यामुळे इंद्रवदन आणि साहिलही जराही बदललेले दिसत नाहीत. आधीच्या सीझनमध्ये हे कुटुंब दक्षिण मुंबईत कफ परेड भागात राहणारं दाखवलं असलं तरीही प्रत्यक्ष त्याचं शूट झालं होतं, कांजूरमार्ग या मुंबईच्या उपरनगरात. आता फक्त त्या आलिशान घरातून मंडळी पेंटहाऊसमध्ये राहायला गेलीत. अर्थात आधीच्या सीझनप्रमाणेच इंद्रवदन-माया- रोसेश एका घरात राहतात आणि साहिल – मोनिषा त्यांच्याच मजल्यावरच्या दुसऱ्या घरात. पेंटहाऊसमध्येही मोनिषा आपला मध्यमवर्गीय वकूब जराही लपवत नाही, असं दुसऱ्या सीझनच्या पहिल्या भागातून दिसतं.

छोटय़ा पडद्यावरचं हे गुजराती कुटुंब म्हणजे विनोदनिर्मितीचा अर्क होतं. एकाच कुटुंबात राहणारी, एकत्र जगणारी, एकत्र वाढणारी माणसं किती वेगवेगळी असू शकतात, त्यांच्यात किती टोकाचे मतभेद असू शकतात, ती एकमेकांशी भांडतात, चिडतात, टोचून टोचून बोलतात, उणीदुणी काढतात पण ती एकमेकांना नाकारत नाहीत. एकमेकांची स्पेस मान्य करून, एकमेकांना जसं आहे तसं स्वीकारून, पण तरीही आपली दुसऱ्याबद्दलची नाराजी जराही न लपवता छपवता, ती उघडपणे मांडत, एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत या साराभाई मंडळींनी तब्बल दोन वर्षे टीव्हीच्या छोटय़ा पडद्यावर जो संसार केला, तो कमालीचा देखणा होता.

पहिल्या सीझनमध्ये मनीषा हे सुनेचं नाव सासूला म्हणजे मायाला भयंकर मध्यवर्गीय वाटतं, म्हणून ती ते लग्नाच्या आधीपासूनच बदलून टाकून मोनिषा असं करून टाकते. तर आता तिची मोनिषाने आपल्या मुलाला, म्हणजे सात वर्षांच्या अर्णवला गुड्डू म्हणण्यावरून कुरकुर चालली आहे. हे असं पंजाबी लोकांसारखं गुड्डू, पम्मी वगैरे म्हणायचं नाही, असं ती बजावत राहते. मोनिषाला सासूचं नाटकी, तथाकथित उच्चवर्गीय वागणं अजिबात आवडत नाही. ती तिच्या परीने कधी कधी जराही दखल न घेता किंवा आपला स्वभाव जराही न बदलता सासूला विरोध करत राहते. सासू सारखं सारखं टोकत असली तरीही मोनिषाचा उत्साह, आनंद जराही कमी होत नाही, हे खरं पण मायाच्या उच्चवर्गीय वागण्यापुढे ती काहीशी दबल्यासारखी वाटत राहते.

प्रत्यक्ष समाजातही तसंच दिसत असतं. आपल्या वाटय़ाला आलेलं जगणं आनंदात जगण्याचा प्रयत्न करणारा मध्यमवर्गीय कुणी तरी पैशाचा तोरा दाखवला की बुजून जातो. उच्चवर्गातला खोटेपणा, कृत्रिम -नाटकी, उथळ वागणं, मध्यमवर्गाला तुच्छ लेखणं हे सगळं पाच-सात वर्षांपूर्वी आलेल्या सागर भल्लारीच्या ‘भेजाफ्राय’ या सिनेमातूनही नेमकेपणाने मांडलं होतं. ‘साराभाई’मधूनही दिग्दर्शकाने तेच मांडलं आहे. अर्थात याचा सरसकट अर्थ सगळे उच्चवर्गीय आढय़ताखोर आणि सगळे मध्यमवर्गीय बावळट-भोळसट असा होत नाही. त्यातल्या ग्रे शेड्स लेखकाला दाखवायच्या आहेत. आनंदात जगणारं भारतीय कुटुंब आणि त्याच्या जगण्याचा पैस मांडताना लेखकानं ‘साराभाई’ कुटुंबाच्या माध्यमातून त्याला जे म्हणायचं आहे, ते म्हणून घेतलं आहे. आणि लेखकाचं म्हणणं पडद्यावर मांडताना सतीश शाह, रत्ना पाठक, सुमीत राघवन, रुपाली गांगुली यांनी कमालीची मजा आणली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या इनिंगमध्ये ‘साराभाई’ मंडळींकडून तेवढय़ाच अपेक्षा आहेत.

वैशाली चिटणीस
response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा