‘चित्रपट’ नावाची जी जादू धुंडीराज गोविंद अर्थात दादासाहेब फाळके यांना गवसली ती जादू प्रत्यक्ष सिनेमाच्या रूपाने पडद्यावर येईपर्यंत दादासाहेबांना कोणाची खरी मदत झाली असेल तर ती त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई फाळके यांची होती. आज चित्रपटसृष्टी म्हणून जो उद्योग विस्तारला आहे तिथे चित्रपटाच्या प्री प्रॉडक्शनपासून ते पोस्ट प्रॉडक्शनपर्यंत कित्येक विभाग आणि तिथे कित्येक तंत्रज्ञ राबतात. मात्र, १९१३ पूर्वी ‘राजा हरिश्चंद्र हा मूकपट आकाराला येत असताना दादासाहेबांकडे कलाकार, कॅमेरामन आणि नेहमीची राबती अशी चाळीसएक माणसे होती. पण, दादासाहेबांचे दिग्दर्शन सोडले तर चित्रित झालेल्या रिळांवर रासायनिक प्रक्रिया करणे, रिळे सुकवणे, संकलन करणे ही सगळी कामे सरस्वतीबाईंकडे होती. या सगळ्या तंत्रांचे प्रशिक्षण दादासाहेब फाळकेंनी आपल्या पत्नीला दिले होते. त्यामुळे आज सिनेमासृष्टीच्या शंभर वर्षांची वाटचाल साजरी केली जात असताना चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्याबरोबरच चित्रपटसृष्टीतील पहिला महिला म्हणून सरस्वतीबाईंचाही उल्लेख व्हायला हवा, अशी अपेक्षा फाळके कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.
चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी रोवली. त्यामुळे त्यांच्याबद्दलचे अनेक संदर्भ आज उपलब्ध आहेत. पण, प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. दादासाहेबांच्या बाबतीत हे शब्दश: खरे असूनही सरस्वतीबाई म्हणजेच माझ्या आजीच्या कार्याची दखल आजवर कुठेच घेतली गेली नाही, अशी खंत दादासाहेब फाळके यांचे नातू किरण फाळके यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली. चित्रपटनिर्मितीची सर्व तांत्रिक अंगे माहीत असणारी ती पहिली महिला होती. तिच्या या कार्याची ओळख फक्त परेश मोकाशी दिग्दर्शित हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटातून दाखवली गेली. आमच्याकडेही तिने केलेल्या कामाचे संदर्भ उपलब्ध नव्हते. पण, गेल्या दोन वर्षांत त्यावेळचे आमचे नातेवाईक, परिचित यांच्याकडून आम्ही आजीच्या चित्रपटातील योगदानाविषयी भरपूर माहिती गोळा केली आहे, असेही फाळके यांनी सांगितले.
चित्रिकरण झाले की संकलन हा जसा महत्त्वाचा भाग असतो तसाच फिल्म तयार करणे हाही तितकाच महत्त्वाचा तांत्रिक भाग असतो. फाळके ंच्या चित्रपटांचे संकलन आणि फिल्म प्रोसेसिंगचे पूर्ण काम सरस्वतीबाई सांभाळत होत्या. शिवाय, प्रॉडक्शन अर्थात एवढय़ा चाळीस एक जणांच्या टीमचे जेवण, त्यांची निवासाची सोय, त्यांच्या चित्रिकरणाच्या वेळा, कपडेपट अशा अनेक गोष्टींची जबाबदारीही सरस्वतीबाई पार पाडत होत्या. त्यामुळे चित्रपटसृष्टीचे तांत्रिक ज्ञान असणारी पहिला महिला म्हणून चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सरस्वतीबाईंचा उल्लेख केला जावा, अशी आपली अपेक्षा असून त्यादृष्टीने विविध प्रयत्न सुरू असल्याची माहितीही फाळके यांनी दिली.
दादासाहेबांचा वारसा जपणाऱ्यांकडे दुर्लक्ष
दादासाहेब फाळके यांचे चित्रपट, त्यांच्याविषयीचे संदर्भ अशा अनेक गोष्टी जतन करून ठेवणाऱ्या फाळके कुटुंबियांकडे दुर्लक्ष झाल्याची खंत किरण फाळके यांनी व्यक्त केली. दादासाहेबांच्या काही चित्रपटांची रिळे माझे वडिल नीलकंठ आणि काका प्रभाकर यांनी जतन करून ठेवली होती. साठच्या दशकात हा चित्रपटांचा दस्तावेज ‘नॅशनल फिल्म अँड टेलिव्हिजन’कडे सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी या चित्रपटांचे संवर्धन करून त्याची आठ एमएमची कॉपी कुटुंबियांनाही दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. पण, गेल्या कित्येक वर्षांत ते आश्वासन पुरे झालेले नाही. असाच अनुभव संदर्भासाठी येणाऱ्या अनेक लोकांकडून आल्याबद्दलही फाळके कुटुंबियांनी यावेळी खंत व्यक्त केली. दरवर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने केंद्र सरकारकडून पुरस्कार दिला जातो पण, यापैकी कुठल्याच सरकारी कार्यक्रमांना हजर राहण्याचे साधे आमंत्रणही कुटुंबियांना दिले जात नाही, असेही ते म्हणाले.
सरस्वतीबाई फाळके : चित्रपटक्षेत्रातील पहिली महिला
‘चित्रपट’ नावाची जी जादू धुंडीराज गोविंद अर्थात दादासाहेब फाळके यांना गवसली ती जादू प्रत्यक्ष सिनेमाच्या रूपाने पडद्यावर येईपर्यंत दादासाहेबांना कोणाची खरी मदत झाली असेल तर ती त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई फाळके यांची होती.
First published on: 11-05-2013 at 12:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saraswatibai falkefirst lady in indian cinema