दिग्दर्शक म्हणून ओमंग कुमारचे चरित्रपट हे तपशिलात एकदम चोख असतात, पण त्यातलं भावनांचं वादळ, तो चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्याला करावासा वाटला तर त्यामागे त्याला जाणवलेलं नाटय़ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात तो अपयशी ठरतो. ‘मेरी कोम’च्या वेळीही असाच प्रत्यय आला होता. मात्र त्या वेळी मेरी बनलेल्या प्रियांकाने हा चित्रपट आपल्या खांद्यावर तोलून धरला होता. ‘सरबजीत’मध्ये कथा सरबजीतची, पण पडद्यावर तुम्हाला दिसतो तो सरबजीतला सोडवण्यासाठी त्याच्या बहिणीने- दलबीरने केलेला संघर्ष. त्यामुळे ती खरी म्हणजे सरबजीतची नव्हे, तर त्याच्या कुटुंबीयांची आणि प्रामुख्याने दलबीरची शोकांतिका ठरली आहे.
पंजाबमधल्या भिंडचा रहिवासी असलेला शेतकरी सरबजीत याच्याबाबतीत जे घडलं तसा प्रसंग कोणा वैऱ्यावरही येऊ नये अशी प्रार्थना करावी इतकं ते दोन देशांच्या सीमेमध्ये चिरडलेल्या माणुसकीचं मन विदीर्ण करणारं चित्र आहे. ८२-८४ च्या सुमारास पंजाब प्रांतालगत असणाऱ्या पाकिस्तानच्या सीमारेषेवर कुठलंही तारेचं कुंपण वेटोळं घालून उभं राहिलं नव्हतं. त्यामुळे एका सामान्य शेतक ऱ्याच्या कुटुंबातील सरबजीतसाठी मित्राबरोबर दारू पिऊन झाल्यानंतर नशेतच घरी परतण्याचा प्रयत्न त्याला पाकिस्तानला पोहोचवता झाला. रात्रीच्या नीरव शांततेत भारतातील कोणी एक सरबजीत पाकिस्तानच्या तुरुंगात तेथे बॉम्बहल्ले घडवणारा अतिरेकी रणजित सिंह म्हणून प्रसिद्ध झाला. तुरुंगात एका पेटीत बंदिस्त करून अन्न-पाण्याविना, उंदरांनी चावलेला आणि पाकिस्तानी सैनिकांनी मारून जर्जर केलेला देह वाचवणं शक्य झालं नाही तेव्हा आपण रणजित असल्याचं मान्य करून सरबजीतने त्या पेटीतून सुटका करून घेतली खरी, पण तिथेच आयुष्यभराची चूक झाली. एक बॉम्बस्फोट करणारा अतिरेकी म्हणून त्याचे आयुष्य पाकिस्तानच्या तुरुंगात काळकोठडी आणि फाशीदरम्यान हेलकावे खात राहिलं.
ravi07
सरबजीतच्या सुटकेसाठी दलबीरने (ऐश्वर्या) केलेला संघर्ष, प्रत्येक वेळी सरबजीतच्या सुटकेचा विचार केल्यानंतर तालिबान्यांनी पाकिस्तानवर आणलेला दबाव, सरबजीतच्या सुटकेवरून लोकसभेत उभं राहिलेलं वादळ या सगळ्या गोष्टी चित्रपटात अगदी तपशीलवार किंबहुना त्या त्या काळातील उपलब्ध फु टेजसह आल्या आहेत. मात्र तरीही या व्यक्तिरेखा खऱ्या असूनही त्या आपला ठाव घेत नाहीत, हे दिग्दर्शकाचे मोठे अपयश ठरले आहे. त्याला जोड मिळाली आहे ती दलबीरच्या भूमिकेतील ऐश्वर्या राय बच्चनच्या कमकुवत अभिनयाची. ऐश्वर्या, सरबजीतच्या पत्नीच्या भूमिकेतील रिचा चढ्ढा यांना सुरुवातीला देण्यात आलेले भडक कपडे, लुक या गोष्टी खटकतात. त्यामानाने काही एक वय झाल्यानंतर ऐश्वर्याला जो लुक देण्यात आला आहे तो योग्य वाटतो. मात्र लुक आणि संवादाच्या बाबतीत रणदीप हुडाने सर्वावर मात केली आहे. दर्शन कुमारही वकिलाच्या छोटेखानी भूमिकेत भाव खाऊ न जातो. मूळ सरबजीतच्या आयुष्याबद्दल आपल्याच देशाने दाखवलेली उदासीनता, बॉम्बस्फोटात बळी गेलेल्या नातेवाईकांच्या खुन्याला शिक्षा व्हायलाच हवी म्हणून कोणतीही शहानिशा न करता सरकारवर दबाव आणणारी पाकिस्तानी जनता आणि आमचा कसाब तर तुमचा सरबजीत अशा देशांतर्गत राजकारणाचे एक दुष्ट चक्रव्यूह याने सरबजीतचा बळी घेतला. त्याच्याबद्दल आपण काहीच करू शकलो नाही, ही भावनाच सुन्न करणारी आहे आणि ती काही प्रसंगांतून आपल्याला धरून राहते. मात्र तपशिलात चोख असलेला हा चित्रपट मनाचा ठाव घेत नाही.

सरबजीत
दिग्दर्शक – ओमंग कुमार
कलाकार – ऐश्वर्या राय बच्चन, रणदीप हुडा, रिचा चढ्ढा, दर्शन कुमार
संगीत – अमाल मलिक, जीत गांगुली

रेश्मा राईकवार