रेश्मा राईकवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एखाद्या छोट्याशा गावातल्या सुशिक्षित तरुणाने अतिशय कमी तिकीट दरात हवाई सेवा पुरवणारी कंपनी सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. हातात फारसे पैसे नसताना कोट्यवधींचे भांडवल लागणारा उद्याोग सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने केलेला संघर्ष, या क्षेत्रातील मातब्बरांना दिलेली झुंज ही कथाच मुळात पुरेशी नाट्यमय व प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच ती कथा चित्रपटरूपात आणण्याचा मोह चित्रपटकर्मींना झाला. असं असूनही मूळ कथेत पुन्हा प्रेमकथा, गाणी-नृत्य असा नको तितका मसाला भरून ते अतिरंजक करण्यावर भर दिला की वास्तवही बेगडी वाटू लागतं. असाच काहीसा प्रकार ‘सरफिरा’ या सुधा कोंगरा दिग्दर्शित चित्रपटाच्या बाबतीत झाला आहे.

‘डेक्कन एअर’ या हवाई कंपनीचे संस्थापक कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांच्या वास्तव कथेवर ‘सरफिरा’ हा चित्रपट आधारित आहे. जी. आर. गोपीनाथ यांनी त्यांची संघर्षकथा ‘सिम्पली फ्लाय : अ डेक्कन ओडिसी’ या पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आणली. याच पुस्तकावर आधारित ‘सुरराई पोत्रु’ या तमिळ चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. सुधा कोंगरा दिग्दर्शित ‘सुरराई पोत्रु’ची हिंदी आवृत्ती म्हणजे अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘सरफिरा’. याही चित्रपटाचं दिग्दर्शन सुधा कोंगरा यांनीच केलं आहे. एक गंमतीदार सरमिसळ या चित्रपटात पाहायला मिळते. हिंदी चित्रपटात मुख्य कथानायक मराठी आणि महाराष्ट्रातील गावातून आलेला आहे. त्यामुळे साहजिकच चित्रपटात अनेक व्यक्तिरेखांच्या तोंडून हिंदी मिश्रित मराठी संवाद बाहेर पडतात. अगदी अक्षय कुमारनेही शुद्ध मराठीत बोलायचा प्रयत्न केला असला तरी त्याच्या तोंडून बाबा असं नको करूस… आई मला माफ कर…यांसारखे साधे संवाद ऐकतानाही विचित्र जाणीव मन भरून राहते. शिवाय, हिंदी आणि दाक्षिणात्य कलाकारांचा एकच भरणा चित्रपटात आहे. त्यामुळे प्रांत, भाषा असे सगळे भेदाभेद चित्रपटात मिटवण्याचा प्रयत्न झाला असला तरी त्यात सहजता नाही. त्यामुळे दृश्यचौकटीतही काहीएक विसंगती जाणवत राहते. कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांनी पाहिलेले अचाट स्वप्न आणि त्यांचा संघर्ष हा खरोखरच प्रेरणादायी असल्याने ‘सरफिरा’ या चित्रपटाला नाही म्हटलं तरी काही प्रमाणात वास्तववादी परिमाण लाभलं आहे.

हेही वाचा >>> स्त्री इच्छांच्या सन्मानाची गोष्ट

साताऱ्यातील एका गावात राहणाऱ्या वीर जगन्नाथ म्हात्रेची (अक्षय कुमार) कथा या चित्रपटात आहे. काहीसा माथेफिरू वाटावा अशा वीरला पाहण्यासाठी राणी (राधिका मदान) आणि तिचे कुटुंब गावात येते. वीरच्या तोडीस तोड किंबहुना त्यापेक्षा अधिक उर्मटपणा राणीमध्ये आहे. मात्र दोघंही महत्त्वाकांक्षी आहेत, दोघांनीही आपापली स्वप्नं पाहिली आहेत. वीरला गरीब-मध्यमवर्गीय लोकांना परवडू शकेल अशी हवाईसेवा देणारी कंपनी सुरू करायची आहे. तर राणीला स्वत:चा बेकरीचा उद्याोग सुरू करायचा आहे. जोपर्यंत आपण आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने ठोस पावलं उचलत नाही तोवर लग्न करायचं नाही म्हणून राणी निघून जाते. चित्रपटाच्या पूर्वार्धातील बराचसा भाग राणीने दिलेल्या या छोट्या धक्क्यामुळे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वीरने सुरू केलेले ठोस प्रयत्न, राणीचा बेकरी उद्याोग आणि तीन वर्षांनी त्यांचं पुन्हा एकत्र येणं यात खर्ची पडला आहे. त्यामुळे वैयक्तिक कौटुंबिक कथा आणि वीरने त्याच्या हवाई दलातील मित्रांबरोबर सुरू केलेली कंपनी या दोन समांतर गोष्टी एकत्रित सुरू राहतात. मग त्यात हवाई क्षेत्रातील धुरिणांकडून वीरला मात देण्यासाठी झालेले प्रयत्न, विशेषत: जॅझ हवाई कंपनीचे मालक परेश गोस्वामी (परेश रावल) यांनी वीरची डेक्कन एअर सुरूच होऊ नये यासाठी सरकारी यंत्रणांवर दबाव आणण्यापासून केलेल्या कारवाया हा सगळा खेळ नाही म्हटलं तरी एका साचेबद्ध पध्दतीने पुढे जातो. अक्षय कुमार आणि राधिका मदान या जोडीची प्रेमकथा, नृत्य-गाणी हा सगळा प्रकार दाक्षिणात्य चित्रपटशैलीसारखा काहीसा भडक आहे. तमिळ चित्रपटाचा रिमेक आणि सुधा कोंगरा याचे दिग्दर्शन याचा हा परिणाम असू शकतो, मात्र त्यामुळे मूळ कथेतली वास्तविकता तितक्या प्रभावीपणे जाणवत नाही.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे चित्रपटात दाक्षिणात्य आणि हिंदी कलाकारांची सरमिसळ आहे. यातली परेश रावल यांनी साकारलेला परेश गोस्वामी मूळ तमिळ चित्रपटामध्येही त्यांनीच साकारला होता. वीरचा वैमानिक मित्र चैतन्य ही भूमिका दोन्ही चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य अभिनेता कृष्णकुमारने केली आहे. वीरचे आई-वडील, गावकरी, वीर आणि वडिलांमधील संघर्ष-अबोला हा भाग खूप छान पद्धतीने चित्रपटात आला आहे. सीमा विश्वास, परेश रावल, प्रकाश बेलकवडी, छोट्याशा भूमिकेत इरावती हर्षे मायदेव, पी, सरथकुमार या कसलेल्या कलावंतांच्या अभिनयामुळे चित्रपट तरला आहे. अक्षय कुमार आणि राधिका मदान ही जोडी फारशी प्रभावी वाटत नाही. इतर अनेक व्यक्तिरेखा असल्या तरी अक्षय एके अक्षय असा हा चित्रपट आहे. ‘सरफिरा’ चित्रपटाच्या मांडणीला असलेला अतिरंजकतेचा मुलामा सोडला तर मूळ कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांची यशोगाथा निश्चितच प्रेरणादायी आहे, त्यामुळे हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो.

दिग्दर्शक – सुधा कोंगरा कलाकार – अक्षय कुमार, राधिका मदान, परेश रावल, सीमा विश्वास, कृष्णकुमार, इरावती हर्षे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarfira movie review by loksatta reshma raikwar zws