सोनी वाहिनीवरील ‘युद्ध’ या मालिकेद्वारे अमिताभ बच्चन हे नाव मालिकांच्या विश्वात शिरतंय. अर्थातच, या बिग बी प्रवेशामुळे छोटय़ा पडद्यावरची समीकरणे नक्कीच बदलणार असल्याने या मालिकेबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. पण ‘युद्ध’मध्ये केवळ अमिताभ बच्चन हे एकच मोठे नाव नाही आहे. या मालिके चा दिग्दर्शक म्हणून सर्जनशील बाबी सांभाळण्याचे काम अनुराग कश्यपने केले आहे, तर मालिकेच्या दर्जेदार आशयाची दैनंदिन जबाबदारी दिग्दर्शक शुजित सिरकारच्या खांद्यावर आहे. याशिवाय,
अमिताभबरोबर मोठे नाव म्हणून अभिनेत्री सारिकाची या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन, नवाझुद्दीन सिद्दिकी, के. के. मेनन अशी तगडी कलाकार मंडळी या मालिकेच्या निमित्ताने छोटय़ा पडद्यावर उतरत आहेत. ‘युद्ध’ ही युधिष्ठिर नामक बिल्डरची कथा आहे. एकीकडे आपला आजार सांभाळत व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यात उठणाऱ्या वादळांना तो कसे सामोरे जातो, यावर मालिकेचे कथानक आधारित आहे. यात सारिका आमिताभ यांच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असून तिचे छोटय़ा पडद्यावरचे हे पहिलेच पदार्पण आहे. यानिमित्ताने, ‘युद्ध’ निवडतानाचे कारण, अमिताभबरोबर काम करतानाचा अनुभव, छोटय़ा पडद्यावरची कामाची पद्धत या सगळ्याबद्दल सारिकाशी त्याचबरोबर अमिताभ यांच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या नवोदित अभिनेत्री अहाना कुम्राशी ‘रविवार वृत्तांत’ने संवाद साधला. ‘युद्ध’ सोनीवर दाखल व्हायच्या आधीच या मालिकेतील युधिष्ठिरच्या पहिल्या कुटुंबाची ही तोंडओळख..
अभिनय क्षेत्रात पुनरागमन केल्यानंतर अभिनेत्री सारिकाने अगदी निवडक भूमिका के ल्या. ‘भेजा फ्राय’, ‘मनोरमा सिक्स फिट अंडर’, ‘कच्चा लिंबू’ अशा काही निवडक आणि वेगळे कथाविषय हाताळणाऱ्या चित्रपटांमधून आपले अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवल्यावर तिने आता आपला मोहरा छोटय़ा पडद्याकडे वळवला आहे. आज छोटय़ा पडद्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. चित्रपटांपेक्षाही मोठा प्रेक्षकवर्ग आज छोटय़ा पडद्यावरच्या मालिकांना मिळतो आहे. त्यामुळे या माध्यमाची दखल घेण्याची गरज असल्याचे सारिका सांगते.
‘युद्ध’ मालिकेत अमिताभ यांच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेत असलेली सारिका ही मालिका निवडण्याचे एक मोठे कारणही अमिताभ असल्याचे सांगते. याआधी सारिका आणि अमिताभ ही जोडी तीन चित्रपटांतून एकत्र आली आहे. तर या दोघांची भूमिका असलेला शुजित सिरकार दिग्दर्शित चौथ्या चित्रपटाला अजून सुरुवात व्हायची आहे. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणे, ही भाग्याची गोष्ट आहेच. पण या मालिकेच्या निमित्ताने तरुण कलाकारांच्या संपूर्ण टीमबरोबर काम करायची संधी मिळाली आणि तो अनुभव नक्कीच सुखावह होता, असे तिने सांगितले. अनुराग कश्यपसारखा दिग्दर्शक असल्यामुळे मालिकेची तांत्रिक बाजूसुद्धा बळकट झाल्याचे मत तिने व्यक्त केले. मालिकेतील आपल्या भूमिकेविषयी बोलताना सारिकाने गौरी हे आपल्या व्यक्तिरेखेचे नाव असल्याचे सांगितले. गौरी एक शांत आणि समाधानी स्त्री आहे. ती तिच्या मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत असते. स्वत: सरकारी नोकरीत असलेल्या गौरीची युधिष्ठिरशी लग्न झाल्यानंतर एका सुखी आणि समाधानी कुटुंबाची अपेक्षा असते. पण युधिष्ठिरची स्वप्नं वेगळी असतात. त्याला आपल्या क्षेत्रात नाव कमवायचे असते. दोघांच्याही या भिन्न मतप्रवाहांमुळे त्यांच्या नात्यात अंतराय निर्माण झालेला असतो. हे सर्व सांगताना ‘युद्ध’ मालिकेच्या एकूणच निर्मिती प्रक्रियेबद्दल आपण समाधानी असल्याचे सारिकाने सांगितले. आपल्याला अभिनय कौशल्य दाखवायची संधी मिळेल अशा प्रकारची भूमिका खूप वर्षांनी साकारायला मिळाल्याचेही तिने यावेळी बोलताना सांगितले. अर्थात, छोटय़ा पडद्यावरच्या पदापर्णातील या सुखावह अनुभवामुळे यापुढेही सारिका मालिकांमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगते. आज छोटय़ा पडद्यावर जे दाखवले जाते त्याबद्दल कितीही टीकेची झोड उठत असली तरी लोकांना ते आवडते आहे, यात काहीच वाद नाही. त्याची खात्री तुम्हाला टीआरपीच्या आकडय़ांवरूनच मिळते. पण त्याच वेळी छोटय़ा पडद्यालाही कथेवर आणि अभिनयावर भर देणाऱ्या मालिकांची गरज आहे, असे मत व्यक्त करतानाच भविष्यात पुन्हा चांगल्या भूमिकेची संधी मिळाली तर नक्कीच छोटय़ा पडद्यावर काम करायला आवडेल, असे तिने सांगितले.
अमिताभ बच्चन ही अभिनयाची शाळा – अहाना कुम्रा
नाटकाची पाश्र्वभूमी असलेली अहाना या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली आहे. एवढेच नाही तर पहिल्याच संधीत ती अमिताभ यांच्या मुलीची भूमिका साकारते आहे. ही भूमिका तिच्यापर्यंत कशी आली, याचा किस्सा सांगताना अहानाने खरे तर ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटाच्या ऑडिशनसाठी अनुरागला गाठल्याचे सांगितले. मी अनुरागला पहिल्यापासून ओळखत होती. त्याच्या चित्रपटासाठी ऑडिशन देण्यासाठी गेले आणि त्याच वेळी त्याने अमिताभ यांच्या मुलीची भूमिका करशील का? असे विाचारले. त्याला नाही म्हणण्याचे कारणच नव्हते, असे अहानाने सांगितले.
 मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल सांगताना तिने सांगितले की ‘तरुणी’ एक साधी सरळ मुलगी आहे. ती एक कर्करोगतज्ज्ञ आहे. त्यामुळे लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच धडपडत असते. अर्थात लहानपणापासून आईसोबत राहिल्यामुळे वडिलांपासून तिची नाळ तुटलेली आहे. पण जेव्हा तिच्या वडिलांना तिची गरज भासते तेव्हा ती ठामपणे त्यांच्या मागे उभी राहते. एक नवोदित अभिनेत्री म्हणून अमिताभ आणि सारिका यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल ती भरभरून बोलते. अमिताभ बच्चन तर एक अभिनयाची शाळा आहे. आमच्या प्रत्येक दृश्याच्या आधी त्या दृश्याचा ते सराव करून घेत असत. आपल्याइतकंच आपल्याबरोबर काम करणाऱ्या कलाकाराचे कामही उत्तम व्हावे, याकडे ते पुरेपूर लक्ष देतात. सारिका यांनी तर सेटवर पहिल्या दिवसापासूनच मी नवीन आहे याची जाणीव कधी होऊ दिलीच नाही. केवळ मालिकेतच नाही. तर सेटवरसुद्धा आम्ही आई-मुलीसारखेच वागत असू.
 पदार्पणातच इतकी मोठी संधी मिळाली त्यामुळे आता जबाबदारी वाढल्याचे वाटते का, याबद्दल बोलताना अहाना सांगते, सध्या मी या मालिकेमुळे भविष्यात मला काय संधी मिळतील याचा विचारच करत नाही. प्रेक्षक लवकरच माझे काम पाहतील आणि माझ्या कामाचा अंदाज त्यांना येईल. त्यामुळे यापुढचे प्रोजेक्ट्स स्वीकारताना लोकांना माझे काम सिद्ध करून दाखवण्याची गरज मला पडणार नाही, असा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarika says small screen gets more trp
Show comments