रेश्मा राईकवार
सामाजिक विषय वा कुठलाही महत्त्वाचा मुद्दा चित्रपटातून मांडताना तो रंजकतेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे गैर नाही. विशेषत: ग्रामीण भागाची पार्श्वभूमी कथेला असेल तर अनेकदा एकतर गंभीर किंवा अतिविनोदी अशा दोनच प्रकारे कथेची मांडणी केलेली पाहायला मिळते. ‘सरला एक कोटी’ या नितीन सुपेकर दिग्दर्शित चित्रपटात या दोहोंचा समतोल राखत एक सुंदर विषय मांडण्याची संधी होती. मात्र नेहमीप्रमाणे रंजकतेची मात्राच यात अधिक पाहायला मिळते.
नितीन सुपेकर यांनी याआधी दिग्दर्शित केलेल्या ‘आटपाडी नाइट्स’ चित्रपटातही सामाजिक विषयाच्या अनुषंगानेच मांडणी केली होती. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये लैंगिक संबंधांबाबत असलेले समज-गैरसमज हा विषय पुरेशा रंजकतेने आणि तितक्याच गांभीर्याने मांडण्यात दिग्दर्शक म्हणून ते यशस्वी ठरले होते. त्यामुळे ‘सरला एक कोटी’ हा नावावरूनच वेगळा विषय असलेला चित्रपट पाहताना साहजिकच वेगळे काहीतरी पाहायला मिळेल ही अपेक्षा होती. या चित्रपटाची मूळ कथा-संकल्पना खूप चांगली आहे. जुगाराच्या म्हणजे पत्ते खेळण्याच्या नादापायी पत्नीलाच डावावर लावणारा तरुण महाभारतानंतर इथे या कथेत दिसतो. स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू यापलीकडे विचारच न करू शकणारे आजूबाजूचे कितीतरी शकुनीमामा चित्रपटाचा नायक भिकाजीपुढे अशी परिस्थिती निर्माण करतात, की पत्त्याचा एक डाव जिंकून आपण सगळं पुन्हा परत मिळवू या आशेपोटी तो पत्नीला पणाला लावतो. या परिस्थितीत सरला काय करणार? चित्रपटात एक संवाद सरलाच्या तोंडी आहे, द्रौपदीला वाचवण्यासाठी कृष्ण देवासारखा धावून आला. गरीब बाईच्या मदतीला कोण येणार? उत्तरच नसलेला हा प्रश्न खरंतर या कथेच्या मुळाशी आहे. पण एक चांगली गोष्ट या कथेत आहे ते म्हणजे आपल्याला कोणी कृष्ण वाचवायला येणार नाही, हे पुरतं जाणून असलेली सरला स्वत:च यावर भन्नाट मार्ग काढते.
भिकाजी हा अगदीच सामान्य दिसणारा गावातला तरुण. नोकरी नसलेला, स्वत:चं असं काहीच नसलेल्या भिकाजीची आई मात्र खूप खंबीर स्त्री आहे. या भिकाजीचं लग्न सरलासारख्या सुंदर तरुणीशी होतं. इतकी सुंदर स्त्री भिकाजीला कशी मिळाली? याचा विचार करत गावातील सर्वाधिक पुरुष फक्त सरलाला मिळवण्याचं स्वप्न पाहू लागतात. कोणाला ती एकदा तरी दुचाकीवर आपल्या मागे बसायला हवी आहे. कोणाला किमान ती तरी आपल्याला वंशाचा दिवा देईल म्हणून तिच्याशी तिसरं लग्न करायचं आहे. कोणाला ती फक्त सहा महिन्यांसाठी उपभोगायला हवी आहे. स्वत:च पत्त्याच्या डावात पत्नीला हरलो आहे म्हटल्यानंतर या प्रत्येकाची मागणी निमूटपणे ऐकण्याशिवाय भिकाजीकडे पर्याय राहात नाही. या अशा गावात किमान कष्ट करून नवऱ्याच्या बरोबरीने पैसे कमवायचे म्हटले तरी ते सरलासाठी सहजसोपं नाही आहे. तरीही या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्याबरोबर नवऱ्याला आणि सासूलाही यातून सहीसलामत बाहेर काढत गतवैभव मिळवण्यासाठी सरला जी शक्कल लढवते त्याची गोष्ट म्हणजे ‘सरला एक कोटी’.
वर म्हटल्याप्रमाणे या चित्रपटाची कथाकल्पना खूप चांगली आहे. आणि काही महत्त्वाच्या मुद्दय़ांना हात घालण्याची क्षमताही या कथेत आहे. मात्र त्या ताकदीने या चित्रपटाची दिग्दर्शकीय मांडणी झालेली नाही. सुंदर स्त्रीला पाहिल्यानंतर पुरुषांच्या मनात संभोगाचे विचार येणे हे साहजिक असले तरी चित्रपटातून ते प्रेक्षकांसमोर ठेवताना ठरावीक पद्धतीच्या अँगलमधून फिरणारा कॅमेरा, सरलाच्या पाठी लाळघोटे करत फिरणारे पुरुष हे दाखवण्यात चित्रपटाचा पूर्वार्ध बराचसा खर्ची पडला आहे. या प्रसंगात ना विनोद आहे ना कुठलीही प्रभाव टाकणारी गोष्ट.. त्यामुळे साहजिकच त्याच त्याच पद्धतीच्या फ्रेम पाहत राहताना कंटाळा येतो. उत्तरार्धात त्या तुलनेत कथा वेगाने पुढे सरकते. धक्कातंत्राचा वापर करण्यासाठीही दिग्दर्शकाने अंमळ उशीरच केला आहे. त्यामुळे कथेतलं वळण वेगळं असलं तरी त्याचा प्रभाव जाणवण्यासाठी प्रेक्षकांना वेळच मिळत नाही. बरं कथेतील काही संदर्भही गोंधळवणारे आहेत. भिकाजी पत्ते खेळण्यात फार हुशार आहे हे जो तो फक्त तोंडी बोलत राहतो. एकाच प्रसंगातून कसंबसं त्याचा पत्त्याचा खेळ पाहायला मिळतो. चित्रपटात मुख्य म्हणवल्या जाणाऱ्या प्रसंगातही भिकाजीची पत्त्यातील हुकूमत दिसतच नाही. मग त्याचं या खेळात पत्नीला डावाला लावणं वगैरे सगळय़ाच गोष्टी रचलेल्या दिसतात. असे काही विसंगत मुद्दे सोडले तर सरलाच्या भूमिकेसाठी अभिनेत्री ईशा केसकरने घेतलेली मेहनत दिसून येते. तिने आपला शहरी तोंडवळा बदलण्याचा पुरेपूर प्रयत्न यात केला आहे. ओंकार भोजनेनेही भिकाजीच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. छाया कदम यांनी नेहमीप्रमाणे आपल्या सहजतेने एक खमकी, खंबीर आणि सुनेवर आईसारखी माया करणारी सासू रंगवली आहे. मात्र इतकी चांगली अभिनेत्री असतानाही छाया कदम यांच्या व्यक्तिरेखेला चित्रपटात करण्यासारखं काही ठोस नाही. तरीही त्यांच्या अभिनयामुळे आई लक्षात राहते. बाकी खलनायक आणि राजकारणी, पोलीस अशा व्यक्तिरेखांतून मराठीतील गाजलेल्या कलाकारांची फौज आपल्यासमोर येते. मुळात जिची कथा आहे ती सरला आणि तिचा गनिमी कावा थोडय़ा अधिक रंगतदार पद्धतीने मांडला असता तर तिचा हा एक कोटीचा डाव अधिक आकर्षक ठरला असता.
दिग्दर्शक – नितीन सुपेकर
कलाकार – ईशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, रमेश परदेशी, अभिजीत चव्हाण.