इंद्र कुमार यांच्या ‘सुपर नानी’ या आगामी चित्रपटात ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका सरोज खान चित्रपटातील एका गाण्यासाठी शास्त्रीय नृत्य दिग्दर्शन करणार आहे. या आधी सरोज खानने दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या ‘दिल’, ‘बेटा’, ‘राजा’, ‘इश्क’ सारख्या अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. ९०च्या दशकातील सरोज यांच्या नृत्य दिग्दर्शनाची जादू ‘सुपर नानी’ चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकवण्यासाठी १६ वर्षांच्या प्रचंड कालखंडानंतर ही जोडी एकत्र येत आहे. या चित्रपटात श्वेता ही इंद्र कुमार यांची मुलगी काम करीत असून, तिच्यावर चित्रीत होणाऱ्या एका गाणासाठी सरोज नृत्य दिग्दर्शन करणार आहेत. हे एक सुंदर गाणे असून, सर्व नृत्य प्रकारात माहिर असलेली सरोज या गाण्यासाठी योग्य असल्याचे मत इंद्र कुमार यांनी व्यक्त केले. याविषयी बोलताना पुढे ते म्हणाले, सरोजला अतिशय आनंद झाला असून, लक्षात राहतील अशी अनेक गाणी तिने या आधी माझ्या चित्रपटांमधून सादर केली आहेत. त्याचप्रमाणे, सरोजच्या जादूई नृत्य दिग्दर्शनावर श्वेता या आपल्या मुलीला नृत्य करताना पाहण्यासाठी आपण अतिशय उत्सुक असल्याचे देखील ते म्हणाले. आपल्या आजीला आयुष्याच्या या वळणावर निराश न होता, काहीतरी भव्य करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या नातवाचे कथानक असलेल्या या चित्रपटात रेखा, शरमन जोशी, रणधीर कपूर आणि अनुपम खेर यांच्या देखील भूमिका आहेत. हा चित्रपट या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा