आठवड्याभरापासून सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. या साऱ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आणि अनेकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यातच आता मराठी कलाकारही या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अनेक मराठी कलाकार कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना मदत करत असून याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपट दिग्दर्शक प्रविण तरडे, रवी जाधव यांनी फेसबुकच्या माध्यमातून कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तर अभिनेत्री सई ताम्हणकर आणि रेणुका शहाणे यांनी मदतीची इच्छा व्यक्त केली आहे. “सोबतच काही मदत लागली तर नक्की सांगा असं”, सईने म्हटलं आहे.


“ज्या कोल्हापूरकर,सांगलीकर रसिकांनी इतकी वर्ष आम्हाला सांभाळलं,आमच्या वर उदंड प्रेम केलं ते संकटात असताना आम्हीही मागे राहू शकत नाही. आम्ही मराठी नाट्य,चित्रपट आणि दूरचित्रवाणी वरील सर्व कलाकार नेहमी तुमच्या सोबत आहोत”, अशी पोस्ट या कलाकारांनी सोशल मीडियावर केली आहे.

वाचा : “माझं कोल्हापूर लवकर पूर्ववत होवो, हीच अंबाबाई चरणी प्रार्थना”

दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांना महापूराने वेठीस धरलं आहे. विविध यंत्रणांनी या दोन्ही जिल्ह्य़ातून दोन लाखांहून अधिक नागरिक आणि २२ हजार जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. एनडीआरएफ, नौदल, लष्कर आणि तटरक्षक दल यांच्या विविध पथकांद्वारे युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

 

Story img Loader