Satish Alekar : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा जनस्थान पुरस्कार मराठी नाटककार,अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक अशी ओळख असलेले सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे या मानाच्या पुरस्काराचं वितरण १० मार्च रोजी गुरुदक्षिणा सभागृह नाशिक येथे होणार आहे. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं जनस्थान पुरस्काराचं स्वरुप असल्याचं कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सतीश आळेकर यांचं नाट्यसृष्टीत मोलाचं योगदान

‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’, ‘महापूर’, ‘बेगम बर्वे’ या नाटकांसाठी प्रसिद्ध आणि भारतीय रंगभूमीवर प्रभावशाली प्रगतीशील नाटककार म्हणून आळेकर सगळ्यांनाच परिचित आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत डहाके आणि पुरस्कार समितीचे अध्यक्ष कुमार केतकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली. वयाच्या ७५ व्या वर्षीही सतीश आळेकर हे ‘ठकीशी संवाद’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर सक्रिय आहेत. महानिर्वाण नाटकाला यंदा ५० वर्षे होत आहेत. ड्युक विद्यापीठातील अध्यापन, एनएसडीचे संचालक पद, नाटकककार विकास योजना, प्रादेशिक थिएटर ग्रुप डेव्हलपमेंटची संकल्पना, फोर्ड फाउंडेशन यातील सक्रिय सहभाग, आंतरराष्ट्रीय नाटकांच्या अनुवाद प्रकल्पांना सहकार्य, ललित कला केंद्राचे प्रमुखपद आणि नाटक, चित्रपट यासाठी अजूनही आळेकरांचा सक्रिय सहभाग या त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा विचार करून त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सतीश आळेकर नाटकाबाबत काय म्हणतात?

सतीश आळेकर म्हणतात, “मला नाटक प्रयोगासहच सुचते. त्यातील रचना, पात्रे, त्यांच्या हालचाली, परस्परसंबंध, त्यांच्यातले अल्प-स्वल्पविराम हे नाटक लिहीत असतानाच माझ्या मनोमंचावर मी पाहत असतो. मी माझ्या नाटकातून परंपरा नाकारली, परंतु आज मागे वळून पाहताना वाटते की आज मी त्या परंपरेचाच एक भाग बनलो आहे,’’ असे अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचं सामाजिक कार्य

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर त्यांना अभिप्रेत असलेले सामाजिक, सांस्कृतिक प्रकल्प उभे करणे, अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे या प्रेरणेतून २६ मार्च १९९० रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना झाली. तेव्हापासून कुसुमाग्रजांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रतिष्ठान कार्य करीत आहे. कुसुमाग्रजांना सामाजिक, आर्थिक व तंत्रज्ञानाच्या प्रगतीपासून वंचित असलेल्या गरीब-असाह्य लोकांबद्दल दया व आदिवासींबद्दल कळवळा होता.

जनस्थान पुरस्काराचे आत्तापर्यंतचे मानकरी

आतापर्यंत मानाचा हा पुरस्कार लाभलेले साहित्यिक म्हणजे विजय तेंडुलकर (१९९१), विंदा करंदीकर (१९९३), इंदिरा संत (१९९५), गंगाधर गाडगीळ (१९९७), व्यंकटेश माडगूळकर (१९९९), श्री. ना. पेंडसे (२००१), मंगेश पाडगावकर (२००३), नारायण सुर्वे (२००५), बाबूराव बागूल (२००७), ना. धों. महानोर (२००९), महेश एलकुंचवार (२०११), भालचंद्र नेमाडे (२०१३), अरुण साधू (२०१५), डॉ. विजया राजाध्यक्ष (२०१७), वसंत आबाजी डहाके (२०१९), मधु मंगेश कर्णिक (२०२१), आशा बगे असे आहेत. आता येत्या १० मार्चला सतीश आळेकर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.