आर के नारायण यांच्या पुस्तकावर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट वहिदा रेहमान यांना घेऊन तयार करण्याची सत्यजित रे यांची इच्छा होती. मात्र, विजय आनंद यांनी हा चित्रपट तयार करण्यास घेतल्याने तसे होऊ शकले नाही, असे वहिदा रेहमान यांच्यावर लिहण्यात आलेल्या नव्या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक प्रेमळ आणि पुरस्कार पटकाविणा-या दिग्गज अभिनेत्री वहिदा रेहमान यांच्यावर चित्रपट लेखक नसिरुद्दीन मुन्नी कबीर यांनी “कन्व्हरसेशन विथ वहिदा रेहमान” हे पुस्तक लिहले आहे.
“कन्व्हसेशन विथ वहिदा रेहमान” हे पुस्तक कबीर यांनी २०१२-१३ साली घेतलेल्या वहिदा यांच्या मुलाखतीवर आधारित आहे. स्वतःच्या अटींवर चित्रपटसृष्टीत पदार्पण करणा-या वहिदा यांनी तरुण वयातच त्यांच्या आई-वडिलांना गमावले.

मुलाखतीवेळी आपले आयुष्य आणि कामाबद्दल बोलताना रेहमान या चैतन्यशील होत्या. या मुलाखतीत त्यांनी ‘गाइड’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. वहिदा म्हणाल्या की, आर के नारायण यांच्या गाइड पुस्तकावर चित्रपट तयार करण्याची सत्यजित रे यांची इच्छा होती. त्यामुळे रे यांनी मला ते पुस्तकही वाचावयास सांगितले होते. ते म्हणाले होते की, जर या पुस्तकावर चित्रपट आला तर मी तुला त्यात रोजीच्या भूमिकेकरिता घेईन. पण त्याच्या एक वर्षानंतर मला त्याचा विसर पडला आणि त्यानंतर देव यांनी गाइड या चित्रपटाची निर्मित करणार असल्याचे सांगितले. जेव्हा मी, सत्यजित रे हा चित्रपट तयार करत नाहीत का? असे विचारले तेव्हा देव म्हणाले की, “नाही, नाही. मी त्या पुस्तकाचे अधिकार विकत घेतले आहेत.” वहिदांच्या मते सत्यजित हा चित्रपट संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीने तयार करणार होते. त्यावेळी, पद्मिनी, लीला नायडूसह अनेक अभिनेत्रींना रोजीची भूमिका साकारण्याची इच्छा होती. तसे त्यांनी मला पत्र लिहले होते की, मी जर ही भूमिका करणार नसेन तर तसे कळवावे. पण, मी रोजीचे पात्र साकारणार हे विधिलिखितच होते, असे वहिदा म्हणाल्या.
वहिदा यांनी गुरु दत्त, राज खोसला कपूर, देव आनंद आणि विजय आनंद यांसोबत केलेल्या कामास आणि नरगिस व नंदा यांच्यासोबतच्या मैत्रीच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. दत्त यांच्यासोबत गाजलेल्या संबंधांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, मला माहित आहे की आम्ही लोकप्रिय आहोत, पण आमचे वैयक्तिक आयुष्य हे खासगीचं राहावे. शेवटी आम्ही केलेल्या कामाने लोक प्रभावित होत आहेत याला महत्व आहे. वहिदा यांनी कमलजीत रेखे यांच्याशी विवाह केला आणि त्यांना दोन मुले आहेत.

Story img Loader