अभिनेता आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाविषयी सोशल नेटवर्किंग साइटवर बदनामी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बुधवारी गुन्हा दाखल केला. संकेतस्थळावरून हा मजकूर काढण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
‘सत्यमेव जयते’विषयी दिशाभूल करणारी माहिती इंटरनेटवर तसेच ‘व्हॉटसअॅप’वरून फिरत आहे. ही माहिती तथ्यहीन आणि बदनामी करणारी असल्याचे सांगत आमिर खानने ८ मार्च रोजी मुंबई पोलिसांची भेट घेऊन तक्रार केली होती. बुधवारी सायबर सेल गुन्हे शाखेने या प्रकरणी आमिर खान प्रॉडक्शन लिमिटेडचे कार्यकारी निर्माता श्रीनिवास राव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. तीन संकेतस्थळांपैकी एका संकेतस्थळावरून हा मजकूर काढण्यात आला असून अन्य दोन संकेतस्थळांवरून तो काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 संकेतस्थळावर आणि व्हॉटसअॅपवरून फिरणाऱ्या माहितीनुसार ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातून मिळणारा निधी ‘ह्य़ुमिनिटी ट्रस्ट’ या स्वयंसेवी ट्रस्टला जातो. ही संस्था मशिदी बांधणे, मुस्लीम तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी कार्यक्रम राबवते, असे म्हटलेले होते.
आमिर खानने स्वत: फेसबुक पेजवरून त्याचा इन्कार केला आहे.  ‘ह्य़ुमिनिटी ट्रस्ट’ नावाची अन्य एक संस्था पश्चिम बंगालमध्ये असून एक डॉक्टर दाम्पत्य सामाजिक कामासाठी ती चालवते, असे त्याने स्पष्ट केले आहे.

Story img Loader