यावर्षी केवळ २ हिंदी चित्रपटांनी तिकीटबारीवर भरपूर कमाई केली. एक म्हणजे ‘द कश्मीर फाईल्स’ आणि दूसरा म्हणजे ‘भूलभुलैया २’. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणलं. अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘भूलभुलैया २’ हा २००७ साली आलेल्या चित्रपटाचा दूसरा भाग होता. या दुसऱ्या भागाकडून फारशा अपेक्षा नसतानाही या चित्रपटाने दणक्यात कमाई केली.
आता कार्तिक आणि कियारा ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा पडद्यावर रोमान्स करताना बघायला मिळणार आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ या आगामी चित्रपटात हे दोघे एकत्र झळकणार असून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्ताचा सीन चित्रीत करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध निर्माते साजिद नाडियाडवाला, आणि शरीन मंत्री केडिया हे ‘नमाह पिक्चर्स’च्या सहाय्याने या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
आणखी वाचा : ‘ब्रह्मास्त्र २’ची जोरदार चर्चा; ‘या’ अभिनेत्याने नाकारली मुख्य भूमिका, कारण जाणून घ्या
शरीन मंत्री केडिया यांनी याआधी मराठी चित्रपट ‘आनंदी गोपाळ’च्या निर्मितीत सहभाग घेतला होता. तसंच ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ या चित्रपटाच्याही त्या सहनिर्मात्या होत्या. या दोन्ही चित्रपटांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले असून यांची चांगलीच प्रशंसा झाली आहे.
कार्तिक कियाराचा हा आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट एक संगीतमय प्रेमकथा असणार आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळी गाणी आणि एक छानशी प्रेमकहाणी बघायला मिळू शकते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा समीर विद्वांस या मराठमोळ्या दिग्दर्शकावर आहे. नुकतंच समीर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे.समीर विद्वांस यांनी आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘आनंदी गोपाळ’, ‘टाइमप्लीज’, ‘डबल सीट’, ‘धुरळा’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट.
तसेच गाजलेल्या ‘समांतर’ या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचे दिग्दर्शनही समीर यांनीच केले होते. आता या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या माध्यमातून समीर हे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. चित्रपटाच्या इतर कलाकारांबद्दल तूर्तास काहीच माहिती मिळाली नसून हा चित्रपट २९ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.