थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित सत्यशोधक या मराठी चित्रपटाचा मुहूर्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, आमदार नीलम गोऱ्हे, विधानपरिषद सचिव युके चव्हाण, प्रधान सचिव अनंत कळसे या मान्यवरांसह अभिनेता संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर व संगीतकार अमितराज उपस्थित होते. वैयक्तिक आयुष्यासोबत सामाजिक जीवनातही अतिशय खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीवर यशस्वीपणे मात करणा-या जोतिबांचा जीवनपट प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेल असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सत्यशोधक चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
समता फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या सत्यशोधक चित्रपटातून महात्मा जोतिबा फुलेंचा जीवनपट उलगडून दाखवला जाणार आहे. जोतिबा फुलेंनी समाज परिवर्तनाचे महान क्रांतीकार्य केले. सत्यशोधक चरित्रपटाच्या माध्यमातून महात्मा जोतिबा फुलेंच्या या परिवर्तनाच्या कार्याची माहिती आजच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महात्मा जोतिबा फुलेंची भूमिका चतुरस्त्र अभिनेते संदीप कुलकर्णी साकारत आहेत. चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांनी केलं असून चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी योगेश जाधव यांनी सांभाळली आहे. प्रवीण तायडे, राहुल वानखेडे, विशाल वाहूर वाघ, अरुण वानखेडे, निखिल पडघन, विनय वानखेडे या सगळ्यांचं चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वाचं योगदान आहे.
छायांकनाची जबाबदारी अरुण प्रसाद यांनी तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी विश्वनाथ मिस्त्री यांनी सांभाळली आहे. संगीत अमितराज यांचं आहे. वेशभूषा महेश शेरला यांची असून रंगभूषा जितेंद्र म्हात्रे व निशिकांत उजवणे यांची आहे.
३ जून पासून सत्यशोधकच्या चित्रीकरणाला मुंबईत सुरुवात होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा