आई- वडिलांसाठी आपले बाळ म्हणजे सर्वस्व असते. याच बाळाच्या जन्माची वेगळी कथा विज्ञान आणि श्रद्धा यांची सांगड घालत मांडण्याचा प्रयत्न नाशिकच्या सौ. स्मिताताई हिरे महाविद्यालयाच्या ‘हर्लेक्विन’ या एकांकिकेतून झाला. तर गरिबांना स्वत:च्या हक्काचे घरकुल मिळवण्यासाठी सख्खी नाती-गोतीही विसरायला लागतात यावर नाशिकच्या गोगटे महाविद्यालयाच्या ‘कुपान’ या एकांकिकेतून भाष्य करण्यात आले. पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य विद्यालयाच्या ‘मध्यांतर’ या एकांकिकेत आजी माजी रंगकर्मीच्या मनातील संघर्ष याविषयीच्या भावना व्यक्त झाल्या.
भ्रमणध्वनी आणि समजमध्यामांच्या आहारी गेलेली लहान मुले आणि त्यांना त्यातून बाहेर काढणे गरजेचे आहे याविषयी हसतखेळत जनजागृती करण्याचा प्रयत्न ठाण्याच्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘डोक्यात गेलंय’ या एकांकिकेतून केला. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, याची प्रचिती आणून देण्याचा आगळा प्रयत्न नागपूरच्या विठ्ठलराव खोब्रागडे महाविद्यालयच्या ‘न्यायालयात जाणारा प्राणी’ या एकांकिकेत झाला. सामाजिक, कौटुंबिक आणि वास्तववादी विषयांची संहिता आणि लेखनातून मांडलेल्या या सहा एकांकिकानंतर भविष्यात जर माणसाला माणसाशी संवाद साधण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी पैसे मोजावे लागले तर? या संकल्पनेवर आधारित ‘टॉक’ या एकांकिकेचे सादरीकरण औरंगाबादच्या न्यू आर्टस कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाने केले. महाभारतात पंडू राजाला नियोग प्रक्रियेतून अपत्य प्राप्त झाली. ही नियोग संस्कृती आजच्या काळात लागू झाली तर त्याचे काय पडसाद उमटु शकतील यावर कोल्हापुरमधील डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी विद्यापीठाच्या ‘विषाद’ या एकांकिकेने भाष्य केले. कोणत्याही गोष्टीवर योग्यवेळी ताबा मिळवला नाही तर ती गोष्ट उतु जाऊ शकते, ही बाब मुंबईच्या कीर्ती एम.डुंगरसी महाविद्यालयाच्या ‘उकळी’ या एकांकिकेत अधोरेखित झाली.