प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा वाढदिवस मागील दोन दशकांपासून साजरा करत आलेल्या एका मोठ्या चाहत्याने तिच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त म्हणजे १५ मेच्या आधीपासून शहरात मोठ्याप्रमाणावर असलेल्या पाण्याच्या समस्येसाठी ‘पाणी वाचवा’ हा उपक्रम सुरू केला आहे.
एक छोटेसे चाटचे दुकान चालवणा-या पप्पू सरदार या ४२ वर्षीय चाहत्याने येथील साकची परिसरात असलेल्या त्याच्या दुकानाबाहेर आणि सुंदरनगर येथील अपंग महिलांच्या ‘चेशायर होम’ या आश्रमाबाहेर माधुरीचा फोटो असलेले मोठे मोठे बॅनर लावून त्याच्या या उपक्रमाला सुरूवात केली. माधुरीच्या फोटोची पूजा करून पप्पू आपल्या प्रत्येक दिवसाची सुरूवात करतो.
या बॅनरवर दिलेल्या संदेशात त्याने लोकांना पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले आहे. पप्पूने सांगितले की, पाणी वाचवा असा संदेश असलेली ५००० पत्रके वाटून तो लोकांना पाण्याची बचत करण्यासाठी प्रेरित करणार आहे. तो पुढे म्हणाला, आपण भ्रष्टाचार थांबविण्यासाठी अपयशी ठरलो, परंतु, एकजूटीने आपण पाण्याची बचत करू शकतो.
१५ मेला माधुरीच्या वाढदिवसानिमीत्त पैसे न घेता तो लोकांना चाट देणार असून, दोन लिटर क्षमतेचे माठ सुद्धा देणार आहे. याशिवाय ५०० मिलीच्या जवळजवळ २००० पाण्याच्या बाटल्या तो माधुरीच्या चाहत्यांना, चेशायर आश्रमातील महिलांना आणि वृद्धाश्रमातील वृद्धांना वाटणार आहे. या आधी पप्पूने माधुरीच्या वाढदिवसानिमीत्त गरीब मुलींची लग्न लावून दिली असून, वृद्धाश्रम आणि चेशायर होमच्या बाहेर थंड पाण्याचे मशीन बसविले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा