आधुनिक विचारांनी, ज्यांनी प्रगतीची वाट दाखवली, त्या महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सोनी मराठी वाहिनीवरील ‘सावित्रीजोती – आभाळाएवढी माणसं होती’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. समाज बदलणारे, आधुनिक समाजाचा पाया असणारे विचार महात्मा जोतीराव फुले यांनी सगळा विरोध पत्करून, तो झुगारून संपूर्ण समाजात रुजवले, याची बीज त्यांच्या आयुष्यात बालपणापासून घडलेल्या अनेक घटनांमध्ये आहेत. बालपणीच सावित्री त्यांच्या आयुष्यात आली, या दोघांनी जे समाजवास्तव पाहिले त्यावर शांत न बसता त्यांनी आयुष्यभराच्या सोबतीने क्रांतीची वाट स्वीकारली.
असे हे आदर्श सहजीवन असलेले जोडपे नुकतेच रंजकपद्धतीने एकत्र आले. तापट स्वभावाचे जोतीराव अर्थात जोती आणि सर्वांना समजून – उमजून घेणारी सावित्री अर्थात सावी यांचे लग्न हे साधेसरळ नव्हते. त्या दोघांच्या स्वभावातला विरोधाभास, फुले कुटुंबियांमधली भाऊबंदकी तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे सामाजिक असमानतेचा मोठे दर्शन आणि या विरोधात लग्नसराईत उभे ठाकलेले जोतीराव यामुळे हे लग्न सर्वस्वी वेगळे ठरले. लग्नानंतर दोघांसमोर विविध घटनांमधून सामोरे आलेल्या असमानता,अस्पृश्यता,बालविधवा या प्रश्नांवर त्यांनी एकत्रपणे व्यवस्थेला विचारलेले प्रश्न आणि त्यातून समोर येणारी सामाजिक जाणीव त्यांच्या आगामी क्रांतीच्या लढ्याची सुरुवात ठरली.
हाच जोतीराव आणि सावित्री यांच्या सहजीवनाचा टप्पा मालिकेत नव्या वळणावर आहे. बालपण संपून मालिकेची गोष्ट ‘सावित्रीजोती’ यांच्या तरुणपणीच्या काळात प्रवेश करते आहे. हा प्रवेश उद्या २० फेब्रुवारीला होणार असून त्याचा सोनी मराठीने प्रसारित केलेला प्रोमो सध्या चर्चेत आहे. ओंकार गोवर्धन,अश्विनी कासार हे दोघेही गुणवंत अभिनयसंपन्न कलाकार जोतीराव आणि सावित्रीच्या भूमिकेत असून नामवंत अभिनेता सक्षम कुलकर्णी,चैतन्य सरदेशपांडे,गुरुदत्त दिवेकर,आनंद पाटील या प्रोमात त्यांच्या सहकार्यांंच्या भूमिकेत दिसत आहेत.
सध्याच्या काळात नव्या पिढीने ‘पुन्हा’ समजून घ्यावा असा पुरोगामी प्रगत महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास ‘सावित्रीजोती – आभाळाएवढी माणसं होती’ ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७. ३० वाजता सोनी मराठीवर मांडते आहे.