बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये हत्या झाली. त्यांना न्याय मिळावा अशी मागणी देशमुख यांचे कुटुंबीय करत आहेत. या प्रकरणानंतर अनेक लोक आणि राजकीय नेते देशमुख कुटुंबाची भेट घेत आहेत. अशातच आता एका मराठी अभिनेत्याने संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे आणि हा अभिनेता म्हणजे सयाजी शिंदे (Sayaji Shinde).
आपल्या दमदार अभिनयाबरोबर सामाजिक भान जपणारा अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. साधं राहणीमान, दमदार अभिनय आणि चेहऱ्यावर कायम एक गोड हास्य घेऊन फिरणारा हा अभिनेता प्रत्येकाला भावतो. आजवर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.
सयाजी शिंदे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून या भेटीचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. धनंजय अंजना आसाराम गुंदेकर या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे सयाजी शिंदेंनी घेतलेल्या संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांच्या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. शिवाय या फोटोंसह त्यांनी असं म्हटलं आहे की, “अभिनेते सयाजी शिंदेंच्या संवेदना जाग्या आहेत. चाकरीच्या बाहेरचा मराठी अभिनेता ही ओळख सयाजी शिंदे यांनी सिद्ध केली आहे.”
या पोस्टमध्ये पुढे असं म्हटलं आहे की, “मस्साजोग येथे पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी आलेले मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते सयाजी शिंदे हे एकमेव आहेत. पीडित कुटुंबाची आस्थेवाईक विचारपूस त्यांनी यावेळी केली. त्यांच्याबरोबर कृषिभूषण शिवराम घोडके यांचीही उपस्थिती होती. झाडं जगवण्याच्या संवेदना दाखवणारे सयाजी शिंदे माणुसकीच्या संवेदना अन् सहवेदना समजून घेताना दिसले.”
या पोस्टवर अनेकांनी सयाजी शिंदेंच्या या कृतीचं आणि त्यांनी जपलेल्या या सामाजिक भानाचंही कौतुक केलं आहे. दरम्यान, अभिनयासह सयाजी शिंदे राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. सयाजी शिंदे यांनी लाखो झाडे लावत सह्याद्री देवराई उभं केलं आहे.