व्यावसायिक चित्रपटांना बाजूला सारत वेगळा आशय आणि मांडणी असणाऱ्या ‘फिल्मिस्तान’, ‘आखोदेखी’, सिटीलाईट’या सारख्या चित्रपटांनी यंदाच्या ‘स्क्रीन पुरस्कार’ सोहळ्यावर आपली मोहर उमटविली. नितीन कक्कड दिग्दर्शित ‘फिल्मीस्तान’, रजत कपूरचा ‘आँखो देखी’ आणि हंसल मेहता दिग्दर्शित ‘सिटीलाईट’ चित्रपटांनी विविध पुरस्कार मिळवित चित्रपटांचा आशय हाच खरा ‘राजा’ असतो हे सिद्ध केले.

२१ व्या वार्षिक लाईफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळ्यावर यंदा खऱ्या अर्थाने तरुणाईचे वर्चस्व होते. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे सूत्रसंचालन, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, गुरुमित चौधरी, जॅकलिन फर्नाडिस, वरुण धवन आदी तरुण कलाकारांनी आपले कलाविष्कार सादर केले. स्क्रीन पुरस्कार सोहळा आणि शाहरुख खान यांचे अतूट नाते आहे. मध्यंतरानंतर बाईकवर स्वार होऊन शाहरुख खानने सोहळ्याची सूत्रे हाती घेतली.     
वेगळे विषय, आशय आणि मांडणी असलेल्या चित्रपटांना प्राधान्य देणारा २१ वा वार्षिक लाईफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळा याहीवर्षी नेहमीच्याच थाटामाटात वांद्रे येथील संकुलात पार पडला.

बॅकस्टेज फोटो गॅलरी : २१ वा लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार २०१५

ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांना या सोहळ्यात ‘जीवनगौरव’पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जीतेंद्र यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चित्रपटासाठी देण्यात येणाऱ्या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स’ पुरस्कारासाठी ‘मंजुनाथ’या चित्रपटाची निवड करण्यात आली. जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना हेमामालिनी यांन सांगितले, आपण या सुंदर सेल्युलाईड सोहळयाचा भाग असल्याबद्दल आनंद वाटतो. हिंदी चित्रपट सृष्टीत येण्याचे भाग्य फार कमी जणांना मिळते. ते मला मिळाले. आता खासदार म्हणून नव्या भूमिकेत काम करत असून तेथेही जीव ओतून काम करेन’      
मराठी चित्रपटांच्या पुरस्कारांसाठी डॉ. प्रकाश बाबा आमटे, फँड्री, रमा माधव, विटी दांडू आणि टपाल या पाच चित्रपटांमध्ये चुरस होती.

२१ वे वार्षिक स्क्रीन पुरस्कार
* सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – विटी दांडू
* सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शक – लक्ष्मण उतेकर (टपाल)
* सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेता – दिलीप प्रभावळकर (विटी दांडू) आणि नंदू माधव (टपाल) 
* सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेत्री – उषा नाईक (एक हजाराची नोट)
* सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार – निशांत भावसार (विटी दांडू)
* परिक्षकांचे विशेष पारितोषिक सिनेमोटोग्राफी – शैलेश अवस्थी (विटी दांडू)  
* अभिनेत्री हेमामालिनी यांना ‘जीवगौरव’पुरस्कार प्रदान.  
* सर्वोत्कृष्ट जोडी – शाहिद कपूर आणि तब्बू (हैदर)
* सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ‘क्वीन’   
* सर्वोत्कृष्ट अभिनेता (हिंदी) – शाहिद कपूर (हैदर)
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (हिंदी) – प्रियांका चोप्रा (मेरी कोम)
* पॉप्युलर चॉईस अ‍ॅक्टर – शाहरुख खान
* पॉप्युलर चॉईस अ‍ॅक्टेस – दीपिका पदुकोण</span>

Story img Loader