तो बॉलीवूडमध्ये आला तेव्हा विशी-बाविशीतला सळसळत्या उत्साहाचा तरुण आणि वयाने सर्वात छोटा कलाकार होता. ‘चॉकलेट बॉय’ ही त्याची तेव्हापासूनची प्रतिमा आज ‘कमिने’ किंवा ‘मौसम’सारखे एखाददुसरे वेगळ्या वाटेवरचे चित्रपट करून बदलली नाही, मात्र ती बदलावी अशी शाहीद कपूरची फार इच्छा आहे. आणि म्हणूनच स्वत:ला पुन्हा एकदा दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या हातात सोपवत त्याने ‘हैदर’सारखा वेगळ्या विषयावरचा, धाटणीचा चित्रपट केला आहे. सध्या चित्रीकरणातून मुक्त झाल्यानंतर ऑगस्टपर्यंत सुट्टीवर असणाऱ्या शाहीदने ‘स्क्रीन चॅट’ कार्यक्रमासाठी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या कार्यालयाला भेट देत दिलखुलास गप्पा मारल्या.
गेली दोन वर्षे शाहीदसाठी फार अवघड गेली. एकाच वेळी बॉलीवूडमध्ये झालेली नव्या कलाकारांची गर्दी, ‘मौसम’सारख्या चित्रपटाने ज्याच्याकडून शाहीदला फार महत्त्वाकांक्षा होत्या तो सपशेल आपटणं यासारख्या घटनांनंतर आपली कारकिर्दीची डुबती नौका वाचवण्यासाठी त्याला हिट चित्रपटांची गरज होती. त्याचसाठी त्याने राजुकमार संतोषींचा ‘फटा पोस्टर निकला हिरो’ आणि प्रभुदेवा दिग्दर्शित ‘आर राजकुमार’ हे दोन चित्रपट केले. त्याने ठरवलेल्या गणितांप्रमाणे प्रभुदेवाच्या ‘आर. राजकुमार’ने त्याला चांगलाच हात दिला आणि तो पुन्हा मुख्य प्रवाहात आला. पण ‘आर. राजकुमार’नंतर एकदम थेट विशाल भारद्वाजचा ‘हैदर’ चित्रपट करण्याचा निर्णय त्याने कसा घेतला? यावर विशाल भारद्वाज यांनीच मला ‘कमिने’सारख्या चित्रपटातून आजवरच्या माझ्या कारकिर्दीतली चांगली भूमिका दिली होती. त्यामुळे त्यांचा ‘हैदर’ ही अप्रतिम कलाकृतीच असणार यात मला शंका नव्हती. खरं तर ‘मौसम’ करत असतानाच विशाल भारद्वाज यांनी एकत्र काम करूया म्हणून चर्चेला सुरुवात केली होती. मात्र कुठलाही नवीन चित्रपट करण्याआधी त्यांना त्यांची शेक्सपिअरच्या साहित्यावरची चित्रत्रयी पूर्ण करायची होती. ‘हॅम्लेट’ त्यांच्या मनात रुंजी घालत होता आणि हॅम्लेटच्या व्यक्तिरेखेला मी न्याय देऊ शके न, माझं आत्ताचं वयही त्या भूमिकेसाठी योग्य आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्या चित्रपटाला मग तो हॅम्लेटवरही का असेना मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं. त्यामुळे ‘हैदर’ चित्रपटाच्या कथा-कल्पनेला सुरुवात झाली तेव्हापासून ते त्याच्या लिखाणापर्यंतची प्रक्रिया आणि मग प्रत्यक्ष चित्रीकरण या सगळ्या प्रक्रियेत मी होतो. इतका तो चित्रपट माझ्यासाठी जवळचा ठरला आहे. किंबहुना, विशाल भारद्वाजने मला दिलेला हा अप्रतिम चित्रपट आहे, अशी मनमोकळी कबुली शाहीदने दिली.
शाहीदने ‘कमिने’सारखा चांगला चित्रपट केला असला तरी हॅम्लेटवर आधारित असलेला ‘हैदर’ चित्रपट करताना त्याला स्वत:ला आलेला अनुभव काय होता? यावर मी न माझा राहिलो.. अशी काहीशी प्रतिक्रिया त्याने दिली. ‘हैदर’ करण्यापूर्वीचा शाहीद आणि चित्रीकरण पूर्ण करून आल्यानंतर परतलेला शाहीद यात खूप फरक आहे, असे त्याने सांगितले. याला कारणंही तशीच आहेत, असे तो म्हणतो. एक म्हणजे शेक्सपिअरची हॅम्लेट ही व्यक्तिरेखाच इतकी गुंतागुंतीची आणि आपल्याला विचार करायला लावणारी अशी आहे आणि ‘हैदर’मध्ये मानवी नातेसंबंधांमधील गुंतागुंत ही हॅम्लेटच्या प्रतीकस्वरूप मांडण्यात आली आहे. ‘हॅम्लेट’ची कथा सगळ्यांनाच माहिती आहे. वडिलांच्या मृत्यूचे कारण शोधणारा हा मुलगा अशा एका गुंतागुंतीच्या परिस्थितीतून जातो आहे. त्याच वेळी त्याचे काका आणि आई यांनी विवाहाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याची स्थिती आणखीनच अवघड होऊन जाते. इतक्या आत-आत नेणाऱ्या मानवी भाव-भावनांच्या पाश्र्वभूमीवर ‘हैदर’ची कथा घडते त्यामुळे चित्रपट किती वेगळा आहे, याची तुम्हालाही कल्पना येईल, असे त्याने सांगितले. दुसऱ्या कारणाचा उल्लेख करताना तो काश्मीरविषयी भरभरून बोलतो. ‘हैदर’चे चित्रीकरण काश्मीरमध्ये करण्यात आले आहे. काश्मीरला जाणं हाच आपल्यासाठी एक वेगळा, आयुष्याचं असं काहीतरी शिकवून जाणारा अनुभव होता, असे शाहीदचे म्हणणे आहे. सुंदर, निसर्गरम्य आणि वरवर शांत वाटणाऱ्या काश्मीरच्या हवेतच एक वेदना आहे, दु:ख आहे आणि ती वेदना तुम्ही तिथे उतरल्यापासून तुमच्या काळजाचा ठाव घेते. इथे खूप काहीतरी घडून गेलंय याची जाणीव तुम्हाला होते. आम्ही जुन्या काश्मीरमधील झायना काडल ब्रिजवर चित्रीकरण केलं. हा ब्रिजच जवळजवळ पाच-सहा वेळा उडवण्यात आला होता. त्यानंतर तिथलं मरतड सूर्य मंदिर तिथे आम्ही चित्रीकरण केलं तेव्हा तब्बल ५ हजार लोक तिथे चित्रीकरण बघण्यासाठी उभे होते आणि ते आता चित्रपटातील एका गाण्याचा भागही आहेत, असे त्याने बोलता बोलता सांगितले. या भूमिकेसाठी झालेली माझी तयारी, विशाल भारद्वाज यांच्याबरोबर झालेल्या चर्चा, काश्मीर या सगळ्यातून माझं मला काही असं वेगळं सापडत गेलं. म्हणजे चित्रीकरणावरून परतल्यानंतर मी माझ्या कुटुंबीयांबरोबर जेवायला बसलो होतो आणि त्यांच्यापैकी प्रत्येकजण मला विचारत होता, ‘काय झालं आहे तुला? काही गंभीर गोष्ट घडली आहे का?’ त्यांनाही मी पहिल्यापेक्षा वेगळा वाटत होतो आणि तेव्हा मला जाणवलं की या भूमिके ने माझ्यावर फार मोठा परिणाम केला आहे, असे शाहीदने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा