अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान एका वेगळया लूकध्ये दिसत आहे. या चित्रपटाचे कथानक दारु माफिया अब्दुल लतिफच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. पण, शाहरुख आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी मात्र या चर्चा नाकारल्या आहेत. चित्रपटाशी निगडीत अनेकांनी याबद्दलच्या चर्चा नाकारल्या असल्या तरीही ट्रेलर आणि चित्रपटाची एकंदर पार्श्वभूमी पाहता अब्दुल लतिफच्याच जीवनाशी ‘रईस’चे कथानक निगडीत आहे असे म्हटले जात आहे.
अब्दुल लतिफचा जन्म १९५१ मध्ये झाला होता. आठ बहिण-भावंडांच्या कुटुंबामध्ये असलेल्या लतिफने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. गैरमार्गाने दारु विक्री करणाऱ्यांसोबत काम करत लतिफने त्याच्या कामाची सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू लतिफ गुजरातमधील सर्वात मोठा दारु माफिया बनला. गुन्हे जगतामध्ये मजबूत पकड बनविण्यासाठी लतिफने राजकारणाची वाटही निवडली होती. १९८६-८७ मध्ये त्याने गुजरातमधील दरियापूर, जमालपूर, कालुपूर, राखांड आणि शाहपूर या पाच नगरपालिकांच्या जागांसाठी निवडणूक लढत त्यात यशही मिळविले होते. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यांमध्ये लतिफच्या नावाचाही समावेश होता.
दरम्यान, लतिफच्या नावे सुरु असणाऱ्या खटल्यांदरम्यान २९ नोव्हेंबर १९९७ ला त्याला चौकशीसाठी कारागृहातून बाहेर नेण्यात आले होते. त्याचवेळी कारागृहात परतताना लघ्वीचे कारण सांगत लतिफने पोलिसांच्या कचाट्यातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या कचाट्यातून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, शाहरुख खानच्या आगामी चित्रपटामध्ये याच गुन्हेगदारी जगताची पार्श्वभूमी असल्यामुळे चित्रपटामध्ये लतिफशी निगडीत काही दृश्ये पाहायला मिळणार आहेत यात शंकाच नाही. २५ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होणाऱ्या ‘रईस’ सिनेमात शाहरुखसोबत नवाझुद्दीन सिद्दीकी आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानही दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राहुल ढोलकिया याने केले आहे. या सिनेमाची निर्मिती रितेश सिद्धवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एण्टरटेनमेन्ट आणि शाहरुख आणि गौरी खान यांच्या रेड चिलीज् एण्टरटेनमेन्टने केली आहे.