ज्येष्ठ अभिनेत्री सीमा पाहवा गेल्या पाच वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यांनी चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय पात्र साकारली आहेत. अलीकडेच सीमा पाहवा यांनी इंडस्ट्रीच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

त्यांचं असं म्हणणं आहे की ही इंडस्ट्री आता पूर्णपणे व्यावसायिक झाली आहे आणि आता त्यावर मोठ्या बिझनेसचे वर्चस्व आहे. त्या म्हणाल्या की, आता क्रिएटिव्ह लोकांबद्दलचा आदर आणि ओळख कमी झाली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, आता त्या चित्रपटसृष्टी सोडण्याचा विचार करत आहेत.

‘बॉलीवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सीमा पाहवा म्हणाल्या, “मला वाटते की मला लवकरच चित्रपटसृष्टीला नमस्कार म्हणावे लागेल. इंडस्ट्रीची स्थिती खूप वाईट आहे. आता ते पूर्णपणे बिझनेसमॅनच्या ताब्यात आहे. मला वाटत नाही की आपण, ज्यांनी या इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्षे काम केले आहे, ते या मानसिकतेसह टिकू शकतील.”

सीमा पाहवा यांनी पुढे सांगितले की, इंडस्ट्री आता कलाकारांच्या कलेकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांनी असेही म्हटले की, चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट बनवण्यासाठी मोठ्या कलाकारांना प्राधान्य देतात.

सीमा म्हणाल्या, “मला वाटतं त्यांना फक्त पैसे कमवायचे आहेत आणि कदाचित म्हणूनच त्यांना आपली गरज नाही. ते आम्हाला म्हातारे म्हणत सोडून देतात. असं म्हणतात की, तुमची विचारसरणी खूप जुनी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की केवळ एक अभिनेताच चित्रपट यशस्वी करू शकतो. त्यांच्या मते, केवळ कमर्शियल गोष्टीच चित्रपट यशस्वी करतात.”

सीमा पाहवा यांनी चित्रपट निर्मात्यांना फटकारले

चित्रपट निर्मात्यांवर टीका करताना ज्येष्ठ अभिनेत्री म्हणाली, “माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही १०० कोटी रुपयांचा चित्रपट बनवता आणि एवढी मोठी रिस्क घेत असाल तर २० कोटी रुपयांचे पाच चित्रपट बनवणे चांगले. किमान दोन चित्रपट हिट होतील. पण, त्यांना फक्त त्याच जुन्या फॉर्म्युल्यावर टिकून राहायचे आहे, ज्याला लोक नाकारत आहेत. आता मी थिएटरवर लक्ष केंद्रित करत आहे आणि मी खूप आनंदी आहे. मला वाटत नाही की आपल्याला चित्रपटांमध्ये तो आदर मिळेल, ज्याच्यासाठी आपण पात्र आहोत.”

सीमा पाहवा पुढे म्हणाल्या, ‘मी इंडस्ट्रीला ५५ वर्षे दिली आहेत, पण जर कोणी येऊन म्हटले की एखाद्याचा पाच वर्षांचा अनुभव जास्त महत्त्वाचा आहे, तर तुम्हाला वाईट वाटते.’ मला खूप दुःख झाले आहे आणि म्हणूनच मी रंगभूमीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी माझ्या कामावर खूश आहे. सीमा ‘भूल चुक माफ’ चित्रपटात दिसणार आहेत. यात राजकुमार राव आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहेत.