अभिनेता सोहेल खान आणि सीमा सचदेवा यांनी लग्नाच्या तब्बल २४ वर्षांनंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही मे महिन्यात न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. घटस्फोटासाठी अर्ज करण्याआधीच्या काही काळापासून हे दोघंही वेगवेगळे राहत असल्याचंही म्हटलं जात होतं. दरम्यान, पहिल्यांदाच सीमा सचदेवाने सोहेलशी घटस्फोट घेण्यामागचं कारण सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीमाने एका मुलाखतीत सांगितले, “मी माझ्या आयुष्याबद्दल सकारात्मक विचार करायला सुरुवात केली आहे. मला पुढे जायचं आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर माझी मुलं आणि कुटुंबीयांनाही माझ्या निर्णयाची माहिती आहे. माझ्या कुटुंबाने ही गोष्ट समजायला हवी की मला माझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह राहायचं आहे. मी कोण आहे हे लोकांना माहित असायला हवं.”

यापूर्वी ‘द फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या शोच्या पहिल्या सीझनमध्ये सीमाने सोहेलसोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. “मी त्याच्यावर प्रेम करते आणि नेहमीच करत राहणार आहे. आमचं नातं खूपच चांगलं होतं. फक्त एवढंच की कधी कधी तुम्ही मोठे होता तेव्हा तुमची नाती वेगळी होतात आणि तुम्ही वेगवेगळ्या दिशांना निघून जाता. आम्ही एका युनिटप्रमाणे आहोत. आमची मुलं खूश आहेत. आमच्यासाठी ही एकच गोष्ट खूप महत्त्वाची आहे,” असं सीमा म्हणाली होती.

सोहेल सीमाला पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडला होता. अभिनेता चंकी पांडेच्या लग्नात सोहेल आणि सीमा यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांच्या भेटी वाढल्या आणि मग दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र सीमाचे कुटुंबीय या दोघांच्या विरोधात होते कारण दोघांचेही धर्म वेगवेगळे होते. पण दोघांनी कुटुंबाच्या विरोधात पळून जाऊन १९९८ साली लग्न केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seema sachdeva open ups about divorce from sohail khan hrc