ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि तबला वादक विनायक थोरात यांनी नि:स्वार्थपणे रंगभूमी व संगीतभूमीसाठी केलेली सेवा ही अमूल्य आहे. या दोन्ही कलाकारांनी आयुष्यभर रंगभूमीसाठी दिलेले योगदान हे आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. तसेच साहित्य, कला, संगीत यांचे संचीत पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करीत आहे, असे वक्तव्य सांस्कतिक मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार विजेते बाबा पार्सेकर यांच्याहस्ते जयंत सावरकर यांना तर गतवर्षीचे संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार विजेत्या श्रीमती निर्मला गोगटे यांच्या हस्ते विनायक थोरात यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष, प्रसाद कांबळी, अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती कीर्ती शिलेदार आणि नवनिर्वाचित नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी आदी मान्यवर उपस्थित होते.

तावडे म्हणाले, कलेची पूजा करणारे ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर आणि विनायक थोरात महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. या दोन्ही ज्येष्ठ कलावंतांच्या माध्यमातून रंगभूमी आणि संगीतभूमीची कला महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात पोहचली. नजिकच्या काळात संगीत नाटकाला नक्कीच चांगले दिवस येतील, असा विश्वासही श्री. तावडे यांनी व्यक्त केला. जयंत सावरकर यांना यावर्षीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि विनायक थोरात यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि रु.५ लाख असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.

या पुरस्कार सोहळयाच्या निमित्ताने दोन्ही पुरस्कारार्थींच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा कलंदर हा कार्यक्रम कलावंतानी यावेळी सादर केला. या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन कौस्तुभ सावरकर यांची केले होते तर नाट्यगीतांना साथसंगत संजय गोगटे आणि विनायक थोरात यांनी केली होती. रवी पटवर्धन, प्रमोद पवार, वसंत इंगळे, अतुल परचुरे, संपदा माने, अविनाश खर्शीकर आणि जयंत सावरकर हे कलाकार नाट्यप्रवेश सादर केला. तर श्रीरंग भावे, मयूर सुकाळे, कल्याणी जोशी, अमेय ठाकूरदेसाई, झंकार कानडे, सूर्यकांत सुर्वे, विघ्नेश जोशी आणि कीर्ती शिलेदार अशा कलाकरांनी नाट्यसंगीत सादर केले. यावेळी संन्यस्त खडग हे प्रमोद पवार यांनी दिग्दर्शित केलेले नाटक मुंबई मराठी साहित्य संघाच्या कलाकारांनी सादर केले तर हाच मुलाचा बाप हे ज्ञानेश पेंढारकर दिग्दर्शित नाटक ललित कलादर्शच्या कलाकारांनी सादर केले.