मराठी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. पुण्यामध्ये आज (मंगळवारी) पहाटे त्यांचे निधन झाले.ते ८८ वर्षांचे होते.  दुपारी बारा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयराम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या. सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी जयराम कुलकर्णी यांचा जन्म झाला होता. काही दिवसांपूर्वीच जयराम यांनी भूमिका साकारलेला खेळ आयुष्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या.

शाळेत असल्यापासूनच जयराम यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे सहावी-सातवीमध्ये असताना शाळेत त्यांनी ‘मोरुची मावशी’ या नाटकात मावशीचे काम केले; तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश ठरला. स. प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका जयराम यांनी साकारली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली.

१९५६ मध्ये जयराम यांनी आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये नोकरी सुरू केली. व्यंकटेश माडगूळकर यांचा सहायक म्हणून जयराम यांची नेमणूक झाली होती. त्यामुळे माडगूळकर यांच्या लेखनाशी जयराम यांचा जवळचा संबंध आला. त्यांच्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीचे वाचन जयराम हे कार्यक्रमाच्या माध्यमातून करायचे. कादंबरीतील कोणते पात्र कोणी करायचे यापासून ते सराव आणि ध्वनिमुद्रणापर्यंतचे काम जयरामच पहायचे होते. तात्यांचा म्हणजेच माडगूळकर यांचा सहायक असल्याने कामाच्या निमित्ताने जयराम यांना त्यांच्या घरी अनेकदा जायला लागायचे. प्रभात रस्त्यावरील माडगूळकर यांच्या घरी गेल्यानंतर अनेकदा ग. दि. माडगूळकर यांच्याशी भेट होत असे. त्यातूनच जयराम यांनी ग. दि. माडगूळकर यांचे साहित्य वाचण्यास सुरुवात केली. जयराम यांनी आकाशवाणीसाठी खास ग्रामीण भाषेत केलेले कार्यक्रम श्रोत्यांच्या चांगलेच पसंतीस पडले.

मराठी सिनेदिग्दर्शक अनंतराव माने यांनी जयराम यांना पहिल्यांदा चित्रपटात काम दिले. कोल्हापूर आणि मुंबई येथे चित्रीकरण असल्याने अभिनयाची आवड आणि नोकरी संभाळताना अनेकदा जयराम यांची तारेवरची कसरत व्हायची. अनेकदा त्यांच्या नोकरीतील रजा संपायच्या. त्यामुळे १९७० च्या सुमारास जयराम यांनी आकाशवाणीच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि अभिनय श्रेत्राकडे वळले. आकाशवाणीमुळे त्या वेळचे मोठ-मोठे कलाकार आणि साहित्यिकांशी जयराम यांची ओळख झाली होती. त्यामुळे चित्रपटात काम करताना पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम या समीकरणानेच प्रत्येक जण त्यांच्याकडे पाहू लागला. सुरूवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका जयराम यांनी चित्रपटांतून साकारल्या. परंतु नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका जयराम यांच्या वाट्याला आल्या आणि त्या त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अजरामर केल्या.

जयराम हे अभिनेत्री मृणाल कुलकर्णींचे सासरे होते. मृणालमुळे अनेक पुस्तके वाचायला मिळतात असं जयराम यांनी ‘लोकसत्ता’मध्ये २०१६ साली प्रकाशित झालेल्या लेखासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. जयराम कुलकर्णी यांच्यामागे पत्नी डॉ. हेमा कुलकर्णी, मुलगा रुचिर आणि सून मृणाल असा परिवार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior marathi actor jayram kulkarni passes away in pune scsg