‘त्या’ मुलाला गाण्याची फारशी आवड नव्हती. त्याला स्वत:ला किंवा त्याच्या आई-वडिलांनाही तो पुढे खूप मोठा गायक होईल असे वाटले नव्हते. क्रिकेट व अन्य मैदानी खेळांची खूप आवड. इतकी की क्रिकेटच्या वेडापायी त्याने चक्क गाण्याच्या परीक्षेलाही दांडी मारली होती. त्याला डॉक्टर व्हायचे होते, पण नियतीने काही वेगळेच योजलेले. पुढे सगळे सोडून त्याने फक्त गाणे एके गाणे याचा ध्यास घेतला आणि याच क्षेत्रात नावलौकिक मिळविला ते ज्येष्ठ गायक व अभिनेते अजित कडकडे आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.
कडकडे आजही गाण्याच्या मैफली, ध्वनिफितींसाठी ध्वनिमुद्रण व कार्यक्रम करत असले तरी संगीत रंगभूमीवरून ते निवृत्त झाले आहेत. संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार होण्याचे आणि नाटकांतून भूमिका करण्याचे भाग्य त्यांना लाभले. कडकडे यांच्यासमवेतची ही ‘पुनर्भेट’ संगीत रंगभूमीवरील त्यांच्या प्रवासाचे स्मरणरंजन करून देणारी.
कडकडे कुटुंबीय मूळचे गोव्याजवळील डिचोली गावचे. इंटपर्यंतचे त्यांचे शिक्षण गोव्यातच झाले. कडकडे घराण्यात किंवा आजोळीही गाण्याचा वारसा नव्हता. त्यांच्या सख्ख्या मामांचा आवाज खूप गोड होता. रेडिओ लावून त्यावरील गाणी ते सतत ऐकायचे व म्हणायचे. तो संस्कार कदाचित लहानपणी त्यांच्यावर झाला. गाणी ऐकायला त्यांना आवडायचे पण गाणे म्हणणे वगैरे दूरच होते. घरच्यांनी सांगितले म्हणून ते गोव्यातील माडीये गुरुजींकडे गाणे शिकायला जाऊ लागले. त्या वेळचा एक किस्सा सांगताना ते म्हणाले, माडीये गुरुजींनी गांधर्व महाविद्यालयाच्या गाण्याच्या पहिल्या परीक्षेला मला बसविले. परीक्षेच्याच दिवशी आमची क्रिकेटची मॅच होती. माझ्या मित्रांनी मला परीक्षेला न जाता क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी येण्याचा आग्रह धरला. मी यष्टीरक्षक होतो. झाले आता काय करायचे. पहिले प्रेम क्रिकेटवर व खेळावर. मग काय गाण्याच्या परीक्षेला जातोय असे सांगून घराबाहेर पडलो आणि थेट क्रिकेटच्या मैदानावर गेलो. मॅचसाठीचे कपडे आणि अन्य साहित्य अगोदरच मित्रांच्या घरी नेऊन ठेवले होते. मॅच खेळून घरी आलो तर माडीये गुरुजी घरात बसलेले. आता लपवण्यात काही अर्थ नव्हता. कुठे गेलो होतो ते सांगितले. त्यावर जो मुलगा गाण्याची परीक्षा सोडून क्रिकेट खेळायला जातो, तो कसला गवई होणार, अशा शब्दांत माडीये गुरुजींनी माझ्याबद्दल वडिलांना सांगितले.
पुढे काही दिवसांनी गावात पं. जितेंद्र अभिषेकी यांची संगीत मैफल झाली. बुवांचे गाणे ऐकून आतून कुठेतरी आपण गाणे शिकले पाहिजे आणि ते ही अभिषेकीबुवांकडेच असे वाटायला लागले. घरी ही गोष्ट सांगितल्यावर त्यांनी पहिल्यांदा ते उडवून लावले, कारण मागचा अनुभव आणि आमच्या घरात कोणीही या क्षेत्रातला नाही. पण मी गाणे शिकायचेच असा हट्ट धरला. अखेर घरातून होकार मिळाला आणि मी वडिलांबरोबर मुंबईला अभिषेकी बुवांच्या घरी आलो. बुवांनी मला काहीतरी गाऊन दाखव असे सांगितले आणि मी जे काही गायलो ते अत्यंत बेसूर होते. ते ऐकून अभिषेकी बुवा वडिलांना म्हणाले हा गाणे शिकण्याच्या शिशूवर्गातही बसणारा नाही. त्यामुळे आतातरी शिकवू शकत नाही. आणखी दोन-चार वर्षे त्याला गाण्याचे शिक्षण घेऊ दे मग माझ्याकडे घेऊन या. त्यामुळे पुढे विसाव्या वर्षांपासून अभिषेकी बुवांकडे माझे खऱ्या अर्थाने गाणे शिकणे सुरू झाले.
गाणे शिकत असताना बुवांकडे सुरुवातीला कडकडे यांना नाटय़संगीत, भावगीत, भक्तिगीत याचे कोणतेही शिक्षण मिळाले नाही. त्यांनी शास्त्रीय संगीताचेच धडे गिरवले. शिकत असतानाच ‘संत गोरा कुंभार’ या संगीत नाटकात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्याविषयी कडकडे यांनी सांगितले, अभिषेकी बुवा एक दिवस मला म्हणाले तुला संगीत नाटकात काम करायचे आहे. खरे तर मला नाटकात काम करायची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे माझे नाही आणि बुवांचे हो असे सुरू होते. शेवटी मी काम करेन असे म्हटले. वैशाली थिएटर्सच्या या नाटकात प्रकाश घांग्रेकर, फैय्याज, नारायण बोडस असे मातबर कलाकार होते. मला पहिल्या व तिसऱ्या अंकात थोडे काम व दोन/तीन गाणी होती. नाटकाचे संगीत अभिषेकी बुवांचेच होते. मी नवखा असूनही त्या मातबर कलाकारांनी मला खूप सांभाळून घेतले. दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित त्या नाटकात काम करण्याचा अनुभव मला खूप काही शिकवून गेला. हे नाटक खूप लोकप्रिय ठरले आणि पुढे याच नाटकामुळे ‘संगीत संशयकल्लोळ’मध्ये नाटकाचे दिग्दर्शक रघुवीर नेवरेकर यांच्यामुळे मला ‘अश्विनशेठ’ ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. माझी आठ ते दहा गाणी नाटकात होती. ज्योत्स्ना भोळे यांच्या कन्या वंदना खांडेकर, स्वत: रघुवीर नेवरेकर नाटकात होते. या नाटकाने संगीत रंगभूमीवरील गायक-अभिनेता म्हणून मला स्वतंत्र ओळख मिळाली. माझे नाव झाले.
‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाने कडकडे यांचा संगीत रंगभूमीवरील प्रवास सुरू झाला. पुढील काळात त्यांनी ‘महानंदा’ (प्रकाश घांग्रेकर, योजना शिवानंद), संगीत शारदा, ‘कुलवधू’ (वंदना खांडेकर), ‘कधीतरी कोठेतरी’, ‘संगीत सौभद्र’ आदी संगीत नाटके केली. भालचंद्र पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात त्यांनी ‘कृष्ण’ साकारला. ‘अमृत मोहिनी’ हे त्यांनी केलेले शेवटचे संगीत नाटक. रंगभूमीवर अभिनेता म्हणून ते फारसे रमले नाहीत. त्याबाबत कडकडे सांगतात, अभिषेकी बुवांच्या सांगण्यावरून मी संगीत रंगभूमीवर आलो. काही वर्षे कामही केले. बैठकीत बसून गाणे आणि रंगभूमीवर गाणे सादर करणे यात खूप फरक आहे. रंगभूमीवर गाणे तुम्हाला उभे राहून सादर करायचे असते. गाण्याबरोबर संवादही असतात. माझी खरी आवड बैठकीत बसून गाणे सादर करण्याची असल्याने काही वर्षांनंतर रंगभूमीवर गायक अभिनेता म्हणून काम करायचा कंटाळा आला आहे. मी आता काम केले नाही तर चालेल का, अशी विचारणा अभिषेकी बुवांना केली आणि त्यांच्याच परवानगीने मी नाटकात काम करायचे पूर्णपणे थांबवले ते आजतागायत. पुढे संगीत रंगभूमीवर पुन्हा काम करण्यासाठी विचारणा झाली होती. पण संगीत रंगभूमीचा तो अनुभव मला गायक अभिनेता म्हणून खूप समृद्ध करून गेला.
संगीत रंगभूमीच्या भवितव्याबाबत विचारले असता ते म्हणतात, पूर्वीच्या काळातील दिग्गज नाटककार व संगीतकार आज नाहीत. संगीत नाटक आणि त्यातील गाणी या दोन्ही गोष्टी मुळातच ताकदीच्या असणे गरजेचे आहे. संगीत नाटकाचे सादरीकरण, त्याचा खर्च परवडणारा नाही. त्याचे किती प्रयोग होतील ते ही सांगता येत नाही. आजच्या पिढीतील तरुण गायक-गायिकांनाही संगीत नाटकाला पुढे भविष्य आहे असे वाटत नाही. गाण्यांच्या कार्यक्रमाच्या तुलनेत येथे मानधनही कमी मिळते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गाणे चांगले येत असले तरी अभिनय करणे सगळ्यांनाच जमते असे नाही. त्यामुळे संगीत रंगभूमीचे भविष्यातील चित्र मला तरी फार आशादायक वाटत नाही.
अभिषेकी बुवांकडे मी अकरा वर्षे गाणे शिकलो. संगीतकार, गायक आणि एक माणूस म्हणूनही ते खूप मोठे होते. माझ्यातील जे काही चांगले आहे ते अभिषेकी बुवांचे आणि वाईट आहे ते माझे स्वत:चे असे कडकडे सांगतात. गोविंदबुवा जयपूरवाले यांच्याकडून मी हिंदी गझल, अभंग शिकलो. माझ्या कार्यक्रमाला ते आले होते. गाणे ऐकून ते मला म्हणाले, तुम्हारे गले मे एकही रंग है. अगर मेरे पास आओगे तो मैं तुम्हे गाना सिखाऊंगा, तुम्हारे गले में और रंग डालुंगा. त्यांच्याकडे मी दोन-तीन वर्षे शिकल्याचेही कडकडे यांनी आवर्जून सांगितले.
अजित कडकडे आणि भक्तिसंगीत किंवा दत्ताची गाणी हे अतूट नाते आहे. साहजिकच गप्पांमध्ये तो विषय निघाला. ते म्हणाले, तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल पण मला भक्तिसंगीताची आवड नव्हती. सुरुवातीला मी जे गाण्याचे कार्यक्रम करत होतो त्यात सुधीर फडके, अरुण दाते यांची गाणी व नंतर अभिषेक बुवांनी संगीत दिलेली व त्यांनीच गायलेली गाणी सादर करत होतो. संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली आणि मी गायलेली ‘सजल नयन नीत धार बरसती’, ‘विठ्ठला मी खरा अपराधी’ ही गाणी तेव्हा लोकप्रिय झाली होती. त्यामुळे माझ्या कार्यक्रमात ती गाणी सादर करायची फर्माईश व्हायची आणि मी गायचो. इतर कॅसेट कंपन्यांनी काढलेल्या ध्वनिफितीमध्येही मी काही भक्तिगीते गायलो होतो. पण माझी स्वत:ची अशी स्वतंत्र ध्वनिफीत निघालेली नव्हती. संगीतकार प्रभाकर पंडित यांच्यामुळे तो योग जुळून आला आणि ‘देवाचिये द्वारी’ ही विविध संतांचे अभंग असलेली ध्वनिफीत प्रकाशित झाली. याचे संगीत प्रभाकर पंडित तर निरुपण कवीवर्य वसंत बापट यांचे होते. ही ध्वनिफीत अमाप लोकप्रिय झाली. पुढे अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, श्री दत्तगुरू यांच्यावरील भक्तिगीते, मंत्र तसेच भक्तिगीतांच्या अनेक ध्वनिफिती निघाल्या. गुलशनकुमार यांच्या ‘टी सिरीज’ने ‘दत्ताची पालखी’ ही मराठीतील पहिली ध्वनिफीत काढली. अनुराधा पौडवाल व मी यातील गाणी गायली होती. याचे संगीत नंदू होनप यांचे होते. यातील प्रवीण दवणे यांनी लिहिलेले ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ हे गाणे अमाप लोकप्रिय झाले. आजही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.
आज मी जो काही आहे त्यामागे अभिषेकी बुवांचे महत्त्वाचे योगदान तसेच देवाची कृपा, आई-वडील आणि संतांचे आशीर्वादही आहेत. संतांचे बोल भक्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम माझ्या हातून घडावे असा कदाचित ईश्वरी संकेत असेल म्हणून ही भक्तिगीते, संतांच्या रचना, मंत्र मला गायची संधी मिळाली. भक्तिसंगीत असो किंवा नाटय़संगीत असो ते सादर करताना मला आतून कुठेतरी ईश्वरी चैतन्य मिळत असते आणि त्यामुळेच माझे गाणे छान होते, रंगते आणि आजही रसिक श्रोत्यांना व सर्वसामान्यांना ते आवडते, भावते असे सांगत कडकडे यांनी रंगलेल्या या गप्पांचा समारोप केला.
शेखर जोशी shekhar.joshi@expreindia.com