गेल्या काही महिन्यात दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. दोन दिवसांत दोन मल्याळम अभिनेत्रींचे दुर्दैवी निधन झाले. त्यापूर्वी तमिळ अभिनेता विजय अँटनीची मुलगी मीरा हिने गळफास घेऊन जीवन संपवलं. आता आणखी एका अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. दिग्गज तमिळ अभिनेते रघु बलैया उर्फ ज्युनियर बलैया यांचे आज (२ नोव्हेंबर २०२३ रोजी) पहाटे निधन झाले.
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नईमधील वलासरवक्कम येथील त्यांच्या निवासस्थानी ज्युनिअर बलैया यांचा गुदमरल्याने मृत्यू झाला. ते ७० वर्षांचे होते. ते चार दशकांहून अधिक काळापासून सिनेसृष्टीत सक्रिय होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रघु बलैया हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते टीएस बलैया यांचे पुत्र होते. त्यांना प्रेमाने ज्युनियर बलैया असं म्हटलं जायचं. त्यांनी १९७५ मध्ये ‘मेलनाट्टू मारुमगल’ मधून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. ‘करागतकरण’, ‘सुंदरा कंदम’, ‘विनर’, ‘साताई’, ‘चिट्ठी’, ‘वळकई’ व ‘चिन्ना पापा पेरिया पापा’ या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. २०२१ मध्ये आलेला ‘नेरकंडा परवई’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. या सिनेमात अभिनेता अजित मुख्य भूमिकेत होता.