रेश्मा राईकवार

सिक्वल किंवा भाग दुसरा.. वगैरे नावाने जो गोंधळ घातला जातो तो बऱ्याचदा यापेक्षा पहिला किमान बरा होता, अशी जाणीव करून देतो. ‘खुदा हाफीज : चॅप्टर २ – अग्नि परीक्षा’ अशा लांबलचक नावाने आलेला सिक्वलपटही याला अपवाद नाही. किंबहुना, दोन वर्षांनी नव्याने आलेल्या या भागात पूर्वापार वापरून गुळगुळीत झालेला कथेचा ढाचा वापरून दिग्दर्शकाने काय साधलं हेच कळत नाही. त्यामुळे चित्रपटाचा हा दुसरा भाग खरं म्हणजे ऐ खुदा.. असं म्हणायला लावणारा आहे. विद्युत जामवालचे चित्रपट हे फक्त त्याच्या अ‍ॅक्शनदृश्यांसाठी पाहिले जातात आणि इथे उत्तरार्धात किमान तेवढी अ‍ॅक्शन पाहण्याची संधी चित्रपट आपल्याला देतो, पण अर्थात इथे ती पर्वणी वगैरै ठरत नाही.

फारुक कबीर दिग्दर्शित ‘खुदा हाफीज : चॅप्टर २’ पाहण्याआधी २०२० साली प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट पाहणे किंवा किमान त्याविषयी काही माहिती घेऊन ठेवली तर ती फायद्याची ठरेल. नाहीतर सुरुवातीपासूनची काही मिनिटे चित्रपटात काय सुरू आहे याचा पत्ता लागणं कठीण आहे. करोनाकाळात थेट ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘खुदा हाफीज’ या चित्रपटात नायक समीर चौधरी आणि त्याची पत्नी नर्गिस यांना नोकरीसाठी परदेश गाठावं लागलं होतं. २००८ साली अमेरिकेत आलेल्या मंदीचा फटका भारतातील कंपन्यांनाही बसला होता. समीर आणि नर्गिसला त्यामुळेच त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. परदेशात आधी नोकरीसाठी गेलेली नर्गिस तिथे भलत्याच दुष्टचक्रात अडकली. देहविक्रयाच्या साखळीत अडकलेल्या नर्गिसला तेथून बाहेर काढण्यात समीर यशस्वी ठरला असला तरी त्याचे तिच्या मनावर झालेले खोल परिणाम भरून आलेले नाहीत. एका जिवंत पुतळय़ासारख्या वावरणाऱ्या नर्गिसला त्यातून बाहेर काढण्यासाठी समीरने मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घेतली आहे, मात्र तरीही नर्गिसला कशातच रस वाटत नाही. कोणीच आपल्याला यातून बाहेर काढू शकत नाही ही तिची धारणा तिला आतून-बाहेरून अस्वस्थ करते आहे. आणि प्रयत्न करूनही तिला बाहेर काढू शकत नाही म्हणून हवालदिल झालेल्या समीरचंही आयुष्य बेरंग झालं आहे. ही पार्श्वभूमी चित्रपटातही बराच काळ अशीच संथ वेगाने पुढे सरकत राहते. उदास झालेल्या या दोघांच्या आयुष्यात समीरच्या मित्राची अनाथ भाची एक आशेचा किरण बनून येते. या लहान मुलीच्या निरागसपणामुळे दोघेही पुन्हा एकमेकांशी मनापासून जोडले जातात. मात्र पुन्हा एकदा दुर्दैव आड येतं. स्त्रियांना भोगवस्तू मानणाऱ्या समाजात शारीरिक अत्याचाराच्या घटनांचे चक्र छोटय़ा-मोठय़ा स्तरावर अव्याहत सुरू आहे. हे चक्र अनाहूतपणे या तिघांच्या आयुष्यावर फिरतं आणि मग पुन्हा होत्याचं नव्हतं होऊन जातं. पुढे या सगळय़ाला कारण ठरणाऱ्यांना हुडकून काढून त्यांना यमसदनास पाठवूनच ही अग्नि परीक्षा संपते. जो या चित्रपटाचा खरा विषय आहे.

सरधोपट कथा आणि मांडणी हे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे मुख्य अपयश ठरलं आहे. पहिल्या भागात किमान अमेरिकन मंदी आणि त्यामुळे बसलेले आर्थिक-सामाजिक फटके हा तरी संदर्भ होता. इथे गोष्ट मायदेशात आल्यानंतर पुन्हा त्याच त्याच मोठया राजकारण्यांचे प्रस्थ, त्यांची बिघडलेली मुलं आणि त्यातून होणारे कांड याच साच्यातून काढून लेखक – दिग्दर्शकाने समोर ठेवली आहे. मुळात एक अगदी अतिसामान्य संगणक अभियंता परदेशात जाऊन सराईत गुन्हेगाराप्रमाणे पत्नीचे शोषण करणाऱ्या गुंडांची सफाई करतो आणि तिला सुखरूप घेऊन परत येतो, हेही अविश्वसनीय होतं. आणि एकदा इतकी रक्तरंजित मारामारी केल्यानंतर पुन्हा चेहऱ्यावर गरीब भाव घेऊन वावरणारा नायक मुळात तर्काच्या कसोटीवर पटतच नाही. बरं दुसऱ्या भागात तरी त्याच्या या अचाट साहसामागची एखादी कथा उलगडली असती तरी ते योग्य ठरतं. इथे त्याला पुन्हा ततसदृश घटनेत अडकवून आधीपेक्षाही भयंकर मारामारी करायला लावली आहे. तार्किक विचार करण्याची सोयच दिग्दर्शक फारुक कबीर यांनी यात ठेवलेली नाही. अल्पवयीन मुलींवर होणारा बलात्कार हा इथे मुख्य धागा आहे, पण तो नेहमीप्रमाणे नायक त्याच्या शैलीत सोडवतो. बडे राजकारणी, भ्रष्ट पोलीस व्यवस्था, हतबल माध्यमे या चित्रात फक्त हातात सुऱ्या – बंदुका घेऊनच नायक उत्तर सोडवू शकतो. त्यासाठी पार कारागृहातील मारामारीपासून इजिप्तपर्यंतची मारामारी आपला नायक यशस्वीपणे पूर्ण करतो. तो कोरडय़ा चेहऱ्याने सराईतपणे बंदुका चालवतो. हे प्रशिक्षण भारतीय चित्रपट नायकांना उपजतच असतं हेही प्रमाण मानून घ्यायला हवं म्हणजे बाकी काही प्रश्न उरणार नाहीत. असो, अभिनयाच्या बाबतीत मुळात विद्युत जामवालला भावनिक अभिनय करायला लावणं हाच गुन्हा आहे. प्रेमात, काळजीत, भयात.. नसा ताणलेल्या चेहऱ्याने वावरणारा विद्युत फक्त अ‍ॅक्शनदृश्ये देताना सुसह्य वाटतो. पण इथे चित्रपटाची कथा अशी आहे की भिंतीवर डोकी आपटणं, देशी सुऱ्या, कात्रीचे पात अशा मिळेल त्या हत्यारांनी भोसकाभोसकी करणं यापलीकडे अ‍ॅक्शनलाही वाव मिळालेला नाही. मग पाहायचं काय? एकूण चित्रपटात ठाकूरच्या भूमिकेतील अभिनेत्री शीबा चढ्ढा, आइस्क्रीमवाल्याच्या छोटेखानी भूमिकेतील काका, असा अगदी एखाद दुसऱ्या कलाकाराने अभिनय केला आहे. बाकी सगळा प्रकार हा प्रेक्षकांच्या संयमाची अग्नि परीक्षा घेणारा आहे. तेही प्रेक्षकांनी संयम वाढवायला हवा, कारण तिसऱ्या भागाची ‘सरकार’ स्टाईलमध्ये सोय करून ठेवल्याचे दिग्दर्शकाने आग्रहाने जाता जाता सांगितलं आहे. किमान तिसऱ्या भागात आपल्या नायकाला काहीतरी करायला काम असणार हेही नसे थोडके..

खुदा हाफीज : चॅप्टर २ – अग्नि परीक्षा

दिग्दर्शक – फारुक कबीर

कलाकार – विद्युत जामवाल, शिवालिका ओबेरॉय, शीबा चढ्ढा, राजेश तेलंग.