Serum Institute Adar Poonawalla Dharma Productions 50% Stake : जगभर पसरलेल्या करोनाविरोधात जालीम लस शोधून काढणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ अदर पूनावाला यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये अदर पुनावाला यांनी तब्बल ५० टक्क्यांची भागीदारी घेतली आहे. रॉयटर्सच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अदर पुनावाला यांचं सिरीन प्रोडक्शन नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे. या प्रोडक्शन हाऊसने धर्मा प्रोडक्शन आणि धर्माटिक एंटरटेनमेंट मध्ये १ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. सेरेन प्रोडक्शनच्या निवेदनात असं म्हटलं आहे. धर्मा प्रोडक्शनचं मूल्य दोन हजार कोटी रुपये आहे. त्यापैकी ५० टक्के अदर पुनावाला यांनी शेअर्स घेतले आहेत.

पूनावाला यांनी सोमवारी सांगितले की, “आम्ही धर्मा प्रोडक्शनची उभारणी व विकास करू आणि आगामी वर्षांत आणखी उंची गाठू अशी आशा आहे.” दरम्यान, उर्वरित ५० टक्के मालकी कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या करण जोहर यांच्याकडेच राहील. “ही भागीदारी म्हणजे जागतिक मनोरंजनाचे भविष्य पाहताना आपल्या मूल्यांचा अन् परंपरांचा सन्मान करण्यासारखे आहे,” असं धर्मा प्रोडक्शनचे अपूर्व मेहता म्हणाले. ते करण जोहरसह या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत.

धर्मा प्रोडक्शनची स्थापना

करण जोहरच्या नेतृत्वाखाली धर्मा प्रॉडक्शनची स्थापना त्यांचे वडील आणि चित्रपट निर्माते यश जोहर यांनी १९७६ मध्ये केली होती. पूर्वी मालकी संरचनेत ९०.७ टक्के करण जोहर आणि ९.२४ टक्के त्यांची आई हिरू जोहर यांचा समावेश होता.

अदर पुनावाला कोण आहेत?

अदर पुनावाल यांची नेट वर्थ १ लाख ३६ हजार कोटी असल्याचा अंदाज आहे. सीरम इन्स्टिट्युटचे संस्थापक सॉयरस पुनावाला यांचे ते सुपुत्र असून टॉप १० सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९८१ झाला. पुण्याच्या बिशप स्कूल आणि कँटरबरीच्या सेंट एडमंड स्कूलमधून त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी लंडनच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.