अभिनेता कमाल आर खान हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता सलमान सोबत सुरु असलेल्या वादात केआरकेला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील दिवाणी कोर्टाने केआरकेला सलमानवर कमेंट्स आणि पोस्ट करण्यापासून तात्पुरते रोखले आहे.
सलमानने केआरके विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायाधीश सी. व्ही मराठे म्हणाले, “प्रतिष्ठा आणि सन्मान हा चांगल्या व्यक्तीसाठी सुरक्षा आणि स्वातंत्र्या समान आहे.” कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार केआरके आता सलमान खान, त्याचं कुटुंब आणि त्याच्या कंपनी विरोधात बोलू शकत नाही. सलमानचे वकील प्रदीप गांधी म्हणाले, “केआरकेच्या सगळ्या पोस्ट अपमानास्पद होत्या. चित्रपटावर कमेंट करण्यावर कोणतीही बंदी नाही पण वैयक्तिक आरोप चुकीचे आहेत.”
आणखी वाचा : चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा; कॅन्सरशी लढा देणारे नट्टू काका झाले भावूक
दुसरीकडे, केआरकेचे वकील मनोज गडकरी म्हणाले, “सलमान खान लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याच्यावर टीका होते. केआरकेने ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाविषयी त्याची प्रतिक्रिया दिली आहे. याचे स्वातंत्र्य हे सगळ्यांना आहे. सलमानचे हे पाऊल त्याच्याविरूद्ध काम करण्यापासून लोकांना रोखण्यासाठी आहे.”
यावर न्यायाधीश म्हणाले, “प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या नावाने ओळखला जातो. कदाचित त्याच्या नावाची समाजासाठी काही किंमत नसेल परंतु त्या व्यक्तीसाठी त्याच नावं हे सर्व काही आहे. आपली चांगली ओळख असणे महत्वाचे आहे.”
आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स
दरम्यान, सलमानने केआरके आणि इतर ९ लोकांविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्याने म्हटले आहे की त्याच्या विरोधात कोणतीही पोस्ट किंवा कोणतीही माहिती प्रकाशित केली जाऊ नये. यात त्याच्या ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटावर केल्या जाणाऱ्या टीकेचाही समावेश आहे. तर, केआरकेने ‘राधे’चा निगेटिव्ह रिव्ह्यू दिल्याने हा संपूर्ण वाद सुरु झाला आहे.