आज मराठी चित्रपट साता समुद्रापार पोहचला आहे. त्यामुळेच इतर भाषांमधील निर्मातेही मराठी चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरत आहेत. याचीच प्रचिती बुधवारी मुंबईत पार पडलेल्या एका रंगारंग सोहळ्यात आली. हिंदीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचे लेखन आणि निर्मिती करणाऱ्या परितोष पेंटर यांच्या कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मितीसंस्थांनी एकत्रितपणे आपल्या आगामी सात नव्या चित्रपटांची घोषणा काल केली.
हेही वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’च्या यशानंतर विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा, ‘या’ विषयावर आणणार वेब सिरीज
या सात चित्रपटांमध्ये ‘निरवधी’, ‘सुटका’, ‘एप्रिल फुल’, ‘फक्त महिलांसाठी’, ‘थ्री चिअर्स’, ‘एकदा येऊन तर बघा’ आणि ‘ती मी नव्हेच’ या सात कलाकृतींची घोषणा करण्यात आली.
‘निरवधी’ चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर, ‘सुटका’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक, ‘एप्रिल फुल’ ही एक थ्रिलर कॉमेडी स्वरुपाची फिल्म असून त्याचे दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव, ‘फक्त महिलांसाठी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी, ‘थ्री चिअर्स’चे लेखन दिग्दर्शन परितोष पेंटर, ‘एकदा येऊन तर बघा रिटर्न जाणारच नाही’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद खांडेकर तर ‘ती मी नव्हेच’ या चित्रपटाचे लेखन परितोष पेंटर यांचे असणार आहे.
या सात चित्रपटांमध्ये मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, अंकित मोहन, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे, सई ताम्हनकर अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या रंगारंग सोहळ्याचं खुमासदार सूत्रसंचालन अभिनेता सुव्रत जोशी याने केलं.