डॅरेन स्टार दिग्दर्शित ‘सेक्स अँड द सिटी’ या दूरदर्शन मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री किम कॅटरालच्या म्हणण्यानुसार ती आता अभिनयासाठी हॉलीवूडपटांवर अवलंबून नाही. १९७५ साली ‘रोझबड’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या किमने ‘कॅडेट थॉमसन’, ‘ब्रूक मॉरिसन’, ‘टिना हॅरवूड’ यांसारख्या अनेक कठीण व्यक्तिरेखा साकारून एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली. पण आता वाढत्या वयामुळे तिला काम मिळणे हळूहळू कमी झाले आहे. तिच्या ‘सेक्स अँड द सिटी’ मालिकेतील सामंथा जॉन्स याच नावाने ती जास्त प्रसिद्ध आहे. इतर कोणत्याही कलाकाराप्रमाणे उत्तम अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. एके काळी अभिनयाबरोबरच ‘सेक्स बाँब’ म्हणूनही ती चर्चेत होती. मात्र वयाबरोबर शरीरातील डौल आणि मादकता संपली आहे. शिवाय, मेरिल स्ट्रीपसारखी उत्तम अभिनयासाठी आपण प्रसिद्ध नाही, म्हणून खंतावणाऱ्या किमने यावरही आता तोडगा शोधून काढला आहे. दुसऱ्या कोणी काम देण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वत:चा निर्माती होण्याचा निर्णय घेतला असून हॉलीवूडपटांपलीकडे जात अन्य पर्याय शोधणार असल्याचे तिने स्पष्ट केले.

Story img Loader