शबाना आझमी हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे एक अशी अभिनेत्री जी दिसायला आपल्यातलीच एक वाटते पण त्याचवेळी ती तितकीच परिपक्वही वाटते. शबाना आझमींनी आत्तापर्यंत अनेक व्यावसायिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र समांतर सिनेमा ही त्यांची पहिली आवड आहे हे त्यांनी केलेल्या चित्रपटांवरुन आणि त्यांच्या कल्पक अभिनयावरुन लक्षात येतं. नाट्य कलावंत शौकत आझमी आणि कवी कैफी आझमी यांची ही मुलगी. या दोघांचा समाजवादाचा संस्कार घेऊनच शबाना आझमी सिनेसृष्टीकडे वळल्या. श्याम बेनगल यांच्या अंकुर या सिनेमातून शबाना आझमींनी पदार्पण केलं. त्यानंतर पुढच्या काळात समांतर सिनेमाच्या नायिका म्हटलं की दोनच चेहरे दिसायचे एक शबाना आझमी आणि दुसरी स्मिता पाटील. आज शबाना आझमींचा वाढदिवस आहे. त्यांची कारकीर्द समांतर सिनेमापासून सुरु झाली आहे.
पहिल्याच सिनेमासाठी शबाना आझमींना राष्ट्रीय पुरस्कार
शबाना आझमी यांना अंकुर सिनेमातल्या ‘लक्ष्मी’च्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा सिनेमा जमीनदार आणि त्याच्याकडे काम करणारा मजूर वर्ग यांच्यातल्या परस्पर संबंधांवर आणि संघर्षावर बेतलेला होता. मूक-बधिर नवऱ्याचा सांभाळ करणारी लक्ष्मी (शबाना आझमी), जमीनदार सूर्याचं (अनंत नाग) तिच्यावर जडलेलं प्रेम आणि नंतर होणारा विदारक शेवट हे सगळं यात पाहण्यास मिळालं आहे. हा सिनेमा आजही एक यशस्वी समांतर सिनेमा म्हणून ओळखला जातो.
‘अंकुर’नंतर शबाना आझमी यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. ‘निशांत’, ‘कादंबरी’, ‘आधा दिन, आधी रात’, स्पर्श’, ‘अर्थ’, ‘अनोखा बंधन’ अशा अनेक समांतर सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. तर दुसरीकडे ‘अमर अकबर अँथनी’, ‘खून की पुकार’, ‘देवता’, लहू के दो रंग’, ‘हम पाँच’, ‘परवरीश’ यांसारखे अनेक व्यावसिक सिनेमाही केले. अंकुर सिनेमातली शबाना आझमींनी साकारलेली ‘लक्ष्मी’ आणि अमर अकबर अँथनी मधली लक्ष्मी यात मात्र जमीन आस्मानाचा फरक होता आणि आपण तसा अभिनय करु शकतो हे शबाना आझमींनी सिद्ध केलं होतं.
शबाना आझमींनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न
शौकत आझमी यांनी त्यांचं आत्मचरित्र असलेल्या कैफ अँड आय मेमॉयर या पुस्तकात शबाना आझमी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला आहे. शौकत या पुस्तकात म्हणतात, ‘शबानाला कायमच हे वाटायचं की मी बाबावर (शबानाचा लहान भाऊ) जास्त प्रेम करते. काही प्रमाणत हे खरं होतं. कारण बाबाचा जन्म झाल्याने त्याने खय्यामची पोकळी भरुन काढली (खय्याम हा शौकत यांचा पहिला मुलगा होता जो खूप लवकर वारला.) शबाना ९ वर्षांची असेल आणि बाबा ६ वर्षांचा. मी त्यांना नाश्ता खाऊ घालत होते. तेवढ्यात मी शबानाच्या ताटातला एक टोस्ट उचलून बाबाला दिला आणि तिला म्हटलं की बाबाची शाळेची बस लवकर येणार आहे, म्हणून तुझ्या ताटातला टोस्ट त्याला देते आहे. तुला शाळेत जायला वेळ आहे त्यामुळे थोडं थांब. मी नोकराला ब्रेड आणायला पाठवलं. तोपर्यंत शबाना तिथून निघून गेली. नोकर ब्रेड घेऊन आला तेव्हा तो टोस्ट करुन मी शबानाला हाक मारली की ये तुझा टोस्ट तयार आहे. तेव्हा मी बाथरुममधून रडण्याचा आवाज ऐकला. शबानाने मला पाहिलं आणि ती डोळे पुसत पटकन शाळेत निघून गेली.’ याच प्रसंगात शौकत पुढे लिहितात, ‘शबाना शाळेत गेली आणि तिने प्रयोग शाळेतली एक निळी वस्तू खाल्ली. ते कॉपर सल्फेट होतं हे कळल्यावर तिच्यावर वेळीच उपचार केले. नंतर मला तिच्या मैत्रिणीने सांगितलं की शबाना तिला सांगत होती की तुमचं शबानापेक्षा बाबावर जास्त प्रेम आहे. तिच्या मैत्रिणीचे हे शब्द ऐकून मी डोक्यावर हात मारला.’
ट्रेनसमोर आली असती शबाना
आपल्या पुस्तकात शौकत आझमी यांनी आणखी एक प्रसंग लिहिला आहे. त्यात त्या म्हणतात, शबाना खूप कठोरपणे वागू लागली होती. तेवव्हा मी तिला म्हटलं तुला असंच वागायचं असेल तर घरात राहू नकोस चालती हो.. त्यानंतर मला कळलं की ती (शबाना आझमी) ग्रँट रोड स्टेशनला गेली आणि तिथे ती रेल्वे रुळांवर गेली. त्यावेळी तिथे तिच्या शाळेचा चौकीदार होता तो ओरडला बेबी, हे काय करते आहेस? आणि त्याने तिला खेचलं. त्यावेळी शबाना दुसऱ्यांदा वाचली. त्यावेळी मी खूप निराश झाले होते. त्यानंतर मी ठरवलं की शबानाला घर सोडून जा असं म्हणायचं नाही.
शबाना आझमींचा क्रश होता शशी कपूर
२००४ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत शबाना आझमी यांनी हे सांगितलं होतं की त्यांना शशी कपूर मला खूप आवडत असे. शशी आणि त्याची पत्नी जेनिफर यांच्याशी आमचा घरोबा होता. पृथ्वीराज कपूर हे अनेकदा आमच्या घरी येत असत. मी जेव्हा फकीरा हा सिनेमा केला तेव्हा मला दडपण आलं होतं कारण त्या सिनेमात माझा हिरो माझा आवडता कलाकार म्हणजेच शशी कपूर होता.
जावेद अख्तर यांच्याशी कसे जुळले सूर?
कवी, गीतकार जावेद अख्तर यांच्या प्रेमात कसे पडलो? हा किस्साही शबाना आझमींनी सांगितला होता. जावेद माझ्या वडिलांकडे (कैफी आझमी) कायम यायचे. आपल्या कविता ते दाखवत असत, वडिलांकडून सल्ला आणि मार्गदर्शन घेत असत. त्यावेळी मी त्यांच्या सहवासात आले, जावेद अख्तर हे खूप चांगले जाणकार आहेत. स्त्रीचा आदर करतात, काही प्रमाणात मिश्किलही आहेत. जावेद हे मला बऱ्याच अंशी माझ्या वडिलांसारखे वाटले त्यामुळे मी त्यांच्याकडे आकर्षित झाले. जावेद आणि माझं प्रेम जमलं पण जावेद यांचं लग्न झालं होतं. त्यामुळे आम्ही काहीवेळा ब्रेक अपही केलं. पण नंतर त्यांनी जावेद अख्तर यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर आम्ही दोघांनी १९८४ मध्ये लग्न केलं. असा किस्साही शबाना आझमींनी सांगितला होता.
स्मिता पाटील आणि मी मैत्रिणी नव्हतो..
समांतर सिनेमात स्मिता पाटील आणि माझ्यात कायमच तुलना व्हायची. त्यावेळच्या पत्रकारांनी आमच्या स्पर्धेवर चवीने लेखही लिहिले होते. त्यामुळे आम्ही कधीही मैत्रिणी होऊ शकलो नाही. मात्र आम्ही दोघीही एकमेकींच्या घरातल्यांचा आणि एकमेकींचा खूप आदर करत होतो. स्मिता खूप लवकर गेली. आजही मला मी तिच्याबद्दल जे वाईटसाईट बोलले आहे त्याचा पश्चात्ताप वाटतो. पण आम्हा दोघींचेही आमच्या एकमेकींच्या कुटुंबीयांशी खूप चांगले संबंध होते. तुम्ही असंही म्हणू शकता की माझं नाव शबाना पाटील आणि तिचं नाव स्मिता आझमी ठेवलं असतं तरीही काही फरक पडला नसता असं शबाना आझमींनी कोमल नहाटाला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.
शबाना आझमी या आजही त्यांच्या खास आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखल्या जातात. फायरसारख्या सिनेमात त्यांनी लेस्बियन महिलेची भूमिकाही साकारली. तर ‘गॉडमदर’ नावाचा एक सिनेमाही त्यांनी केला. बायोपिकचं पेव फुटण्याआधी ‘गॉडमदर’ हा सिनेमा आला होता. यात शबाना आझमींनी संतोकबेन जडेजा या भारतातल्या पहिल्या महिला डॉनची व्यक्तिरेखा साकारली होती. संतोकबेनने या सिनेमाला विरोध दर्शवला होता. मात्र हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमातली शबाना आझमींची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. इतकंच नाही तर या सिनेमाला १९९८ मधले सहा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट एडिटिंग, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, सर्वोत्कृष्ट गीतकार हे सहा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाले आहेत. शबाना आझमी यांनी जेव्हा जेव्हा वेगळी भूमिका केली तेव्हा त्यांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. त्यामुळेच त्यांना समांतर सिनेसृष्टीची गॉडमदर म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही.