ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी चित्रपटसृष्टीतील ४० वर्षे पूर्ण केली आहेत. १९७४ पासून चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरूवात करणाऱ्या शबाना आझमी यांनी ‘अंकुर’ चित्रपटाद्वारे या क्षेत्रात पदार्पण केले. चित्रपट क्षेत्रातील आपला ४० वर्षांचा प्रवास पूर्ण करणाऱ्या शबाना आझमी यांनी दिग्दर्शक शाम बेनेगल यांचे आभार मानले आहेत. दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ चित्रपटाद्वारे हा नवा चेहरा लोकांसमोर आणला. याच चित्रपटासाठी शबाना आझमी यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. “अकुंर हा माझा पहिला चित्रपट ४० वर्षांपूर्वी २४ सप्टेंबर १९७४ ला प्रदर्शित झाला होता. माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच मला उत्कृष्ट चित्रपट दिल्याबद्दल शाम बेनेगल आपले आभार.” असा संदेश शबाना आझमी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

शबाना आझमी यांनी १२० हून अधिक हिंदी आणि बंगाली चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. यात व्यावसायिक तसेच समांतर चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून त्यांनी भूमिका वठविल्या आहेत. ‘जुनून’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘कंधार’, ‘स्पर्श’, ‘पार’, ‘सती’, ‘अर्थ’ आणि ‘गॉडमदर’ इत्यादी एका पेक्षा एक सरस अशा चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. जॉन श्लेसिंगर यांचा ‘मॅडम सोऊसाटस्का’ आणि रोनाल्ड जॉफ यांचा ‘सिटी ऑफ जॉय’ या हॉलिवूड चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला आहे. कवी आणि पटकथाकार जावेद अख्तर यांची पत्नी असलेल्या शबाना आझमी अभिनय करण्याबरोबर सामाजिक आणि स्त्रियांच्या अधिकाराच्या चळवळीतदेखील सक्रिय असतात.