बॉलीवूड बादशाह शाहरुख खान ब्लॉकबस्टर चित्रपट देत असला तरी चित्रपटांपेक्षा त्याच्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी या नेहमीच चर्चेचा विषय असतात. ज्यावेळेस शाहरुख आणि गौरीने सरोगसीद्वारे तिस-या अपत्याला जन्म देण्याची बातमी आली तेव्हा ती अफवा असल्याचे समजले जात होते. अखेर, या बॉलीवूड जोडीने ‘अब्राम’ या तिस-या सरोगेट अपत्याच्या जन्माचा आनंद माध्यमांद्वारे जाहीर केल्यावर ही बातमी खरी असल्याचा खुलासा झाला. शाहरुखपूर्वी मिस्टर परफेक्ट्शनिस्ट आमिर खान आणि पत्नी किरणने सरोगसीद्वारे ‘आझाद’ या त्यांच्या मुलाला जन्म दिला होता.
बॉलीवूड कलाकारांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट अगदी त्यांच्या दुःखाचेही लोकांना कुतूहल असते. पण, सरोगेसीसारखी अतिशय वैयक्तिक आणि संवेदनशील बाब लोकांसमोर आणून निपुत्रिक जोडप्यांना सरोगसीद्वारे अपत्याला जन्म देण्याची प्रेरणा या बॉलीवूड कलाकारांनी दिली आहे.
मुंबईच्या लोकल रेल्वेमधील पन्नाशीच्या दोन स्त्रियांमधील संभाषण उल्हासित करणारे होते. त्यातील एका महिलेच्या सूनेला मुल होऊ शकत नसल्यामुळे तिने दुस-या महिलेस दिलेले उत्तर,” सूनेचे आरोग्य गरोदर राहण्यास प्रतिकूल नसल्यामुळे आम्ही सरोगसीचा मार्ग स्वीकारु नाहीतर मुल दत्तक घेऊ. आमिर, शाहरुखसारखे मोठे लोक जर सरोगसीचा मार्ग अवलंबत आहेत तर हे नक्की ठीक असेल.”
२००२ साली सरोगसी प्रक्रियेला भारतात अधिकृत मान्यता मिळाली आहे.