बॉलीवूड बादशाह शाहरुख खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी हे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. पण, ‘दिलवाले’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी न केल्याने या दोघांमध्ये काही वाद निर्माण झाल्याचे म्हटले जातेय. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या चित्रपटावर होताना दिसत आहे.
स्पॉटबॉय डॉट कॉमच्या वृत्तानुसार, शाहरुख आणि रोहित शेट्टी हे दोघे मिळून मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. मात्र, या चित्रपटाची बोलणी आता पुढे ढकलण्यात आलीयं. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव करणार होता. ‘दिलवाले’च्या प्रदर्शनानंतर लगेचच या चित्रपटाबद्दल चर्चा करण्यात येणार होती. पण, चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन महिने उलटले तरी कोणतीही चर्चा अद्याप करण्यात आलेली नाही. संजय जाधवच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, सहा-सात महिन्यांपूर्वी त्यांची रोहित आणि शाहरुखशी चर्चा झाली होती. पण त्यानंतर या प्रोजेक्टविषयी काहीच बातचीत झालेली नाही. संजयने सुद्धा चित्रपटाच्या चर्चेसाठी त्यांच्या मागे लागणे सोडून दिले आहे, असेही तो म्हणाला.

Story img Loader